उमरगा, दि.२० उमरगा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुळज गावातील एका 17 वर्षीय मुलीच्या विवाहाचे दि. 19 मे रोजी आयोजन करण्यात आले होते. याची कुनकून पोलीसांना लागताच उमरगा पो.ठा. चे पोहेकॉ- सुर्यवंशी यांनी मुळज येथे जाउन उपसरपंच व पोलीस पाटील यांसह त्या वधु- वर पक्षांची भेट घेतली. विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण असने गरजेचे असल्याचे तसेच मुलीवर अल्पवयात विवाह, मातृत्व लादल्यास तीचा शारिरीक- मानसिक विकास खुंटन्याची शक्यता असल्याचे  त्यांना पटवून देण्यात आले.  यावर दोन्ही पक्षांनी हा बालविवाह मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण होईपर्यंत पुढे ढकलत असल्याची पोलीसांना लेखी निवेदनाद्वारे हमी दिली.

दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. 20 मे रोजीही असाच एक बालविवाह उमरगा पो.ठा. हद्दीतील एकोंडी गावात संपन्न होणार होता. एकोंडी येथील एका युवकाचा दि. 20 मे रोजी संपन्न होत असलेला विवाह ऐनवेळी वधु पक्षाने रद्द केल्याने वर पक्षाने गावातीलच एका 17 वर्षीय मुलीशी त्याच्या विवाहाचे तात्काळ आयोजन भावी वधु पक्षाच्या संमतीने केले. परंतु याही विवाहात नियोजीत वधूचे वय 18 वर्षे पुर्ण नसल्याची गोपनीय खबर उमरगा पोलीसांना मिळताच तात्काळ उमरगा पो.ठा. चे पोहेकॉ- कोळी, पोना- शिंदे, मुंढे, पोकॉ- लांडगे, गृहरक्षक दल जवान- बाळु राठोड यांनी मुळज येथे पोहचले. 


पोलीसांनी त्या वधु- वर पक्षांची भेट घेउन आदल्या दिवशीच्या घटने प्रमाणे त्यांचेही प्रबोधन केले. याही वेळी दोन्ही पक्षांनी हा बालविवाह मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण होईपर्यंत पुढे ढकलत असल्याची पोलीसांना लेखी निवेदनाद्वारे हमी दिली.



अशा प्रकारे उमरगा पोलीसांच्या सतर्कतेने दोन मुलींचे बालविवाह टळले. या कामगीरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप पालवे यांनी उमरगा पोलीस ठाण्यातील नमूद अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

 
Top