तुळजापूर, दि. ३१ :
तुळजापूर शहरातील मंकावती गल्ली मध्ये असणाऱ्या मंकावती तीर्थ कुंडाच्या परिसरात बेकायदेशीरपणे होत असलेले बांधकाम त्वरीत थांबवुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी व तुळजापूर नगराध्यक्ष यांना निवेदन देऊन मनसेचे जिल्हा संघटक अमरराजे कदम यांनी केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा संघटक अमरराजे कदम व युवक नेते समाधान कदम यांनी निवेदन देऊन तुळजापूर शहराची प्राचीन ओळख असणाऱ्या मंकावती तीर्थकुंड उर्फ विष्णू कुंड येथे बेकायदेशीर बांधकाम केले जात असल्याचा आरोप करुन याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंकावती तीर्थकुंड उर्फ विष्णू कुंड आहे, अत्यंत प्राचीन असून भेंडोळी सणाच्या निमित्ताने महंत मावजी महाराज जास्तच कुंडामध्ये स्नान करून शुद्ध होऊन तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला वर्षातून एकदा जातात ही प्राचीन जुनी परंपरा आहे. त्यामुळे हे तीर्थकुंड कोणाच्याही खासगी मालकीचे नाही. तसेच तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गत या तीर्थ कुंडचा विकास करण्यासाठी यापूर्वी निधी खर्च करण्यात आला आहे.
या संदर्भातील सर्व दस्तऐवज तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध असून जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन यांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करून सदर तीर्थकुंड भाविक भक्तांना स्नानासाठी खुले करावे, यापूर्वी नगर परिषदेने पाच रुपये दर लावून येथील कुंडामध्ये तुळजाभवानी देवीच्या भाविक भक्तांना स्नानाची सोय केली होती. या संदर्भातील पुरावे नगर परिषदेकडे आजही उपलब्ध असून या सर्व कागदपत्रांच्या आधारे सदर तीर्थ कुंडावर बेकायदेशीरपणे करण्यात येणारे काम थांबून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.