मुरूम, दि. ३१ : 
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील कृष्णा खोरे साठवण तलावाच्या बाजूला रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीने सार्वजनिक विहिरीचे खोदकाम पोकलेनच्या साह्याने रातोरात करून बोगस मजूर दाखवून लाखो रुपयेचा गैरप्रकार  करण्याचा प्रयत्न  लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या कामाची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अचलेर ग्रामस्थांनी लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद व  विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 


सुरवातीला  दि. १५ एप्रिल व नंतर २६ मे रोजी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या संबंधित  उपअभियंता  यांनी पोकलेन व जेसीबीच्या साह्याने रात्री अचलेर येथील ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर रोजगार हमी योजनेतून  खोदून घेतल्याचा  आरोप ग्रामस्थांनी एका निवेदनातून केला आहे. ही सार्वजनिक विहीर रोजगार हमी योजनेतून मंजूर करण्यात आली होती. शासनाच्या उद्दिष्टानुसार मजुरांच्या हाताला काम मिळावे, असा उद्देश असताना संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून रातोरात विहीर खोदाई केली आहे. या प्रकरणाची नियम बाहय कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे अचलेर ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उस्मानाबाद, तहसीलदार, लोहारा व त्यानंतर विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर विकास गोपने, समर्थ सोमवंशी, हिराकांत सोलंकर, जयेश कणभुसे, महादेव कंटे, सुधीर बंडगर, हरिश्चंद्र खरात, अतुलराजे सोमवंशी, दत्तु गावडे, केतन सोमवंशी, सागर खंडाळकर, सुरज सोलंकर, गोपाल राजपूत, तुळशीराम सोलंकर, दत्ता गोपणे, भिम सुतार आदींनी चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 
 
Top