तुळजापूर, दि. ३१ :
तुळजाभवानी मंदिराच्या समोर मंकावती गल्लीत असणाऱ्या विष्णू कुंड जय मंकावती तीर्थकुंड या नावाने परिचित आहे. येथे बेकायदेशीरपणे करण्यात येणारे बांधकाम तातडीने थांबून ते तिर्थ कुंड तुळजाभवानी देवीच्या भावी भक्तांना स्नानासाठी पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करावे अशी मागणी महंत मावजीनाथ महाराज आणि त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज , महंत आरण्य गिरी महाराज, ॲड. जनक पाटील, संजय सोनवणे, सुदर्शन वाघमारे यांनी जिल्हाधिकारी आणि तुळजापूर येथील तहसीलदार यांना निवेदन देऊन सदर तीर्थकुंड भक्ताला खुले करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
येथे पूर्वी नगरपरिषदेच्या वतीने पाच रुपये दर लावून भावी भक्तांना स्नानाची सोय नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आली होती. ती सोय पुन्हा चालू करण्यात यावी, या तीर्थ कुंडाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये निधीची तरतूद करुन व निधी या तीर्थ कुंडावर खर्च करण्यात आलेला आहे. हे सार्वजनिक असणारे तीर्थकुंड पुढील काळात देवीच्या भावी भक्तांना स्नान करण्यासाठी मिळावे अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
मंकावती तीर्थकुंड हे पवित्र तीर्थ कुंडा असून हे हिंदू समाजाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे अनाधिकृतपणे व बेकायदेशीरपणे होणारे बांधकाम तात्काळ थांबून महाराष्ट्र सरकारच्या या मालमत्तेचे संरक्षण झाले पाहिजे, यासाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनात महंत मावजीनाथ महाराज व त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.