उमरगा दि.१२ 
उमरगा शहरातील  डॉ.आर . डी शेंडगे हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या महात्मा फुले व प्रधानमंत्री आरोग्य योजनेतील  गैरप्रकरणी  सीआयडी किंवा सीबीआय मार्फत चौकशीकरून गैरव्यवहार करणाऱ्या  दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेचे शाहूराज माने यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर  यांच्याकडे केली आहे . 


 जिल्हाधिकारी  यांना दिलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे कि, गतवर्षी कोरोना काळात व त्यापूर्वी महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान योजनामध्ये  शेंडगे हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटरने बनावट लाभार्थी दाखवून करोडो रुपयेचा गैरव्यवहार केल्याचे शासकीय  चौकशीत निष्पन्न झाल्याचे आरोप करुन   याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी संबंधित हॉस्पिटलचा परवाना रद्द करावा व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत असा प्रस्ताव शासनाकडे व आरोग्य विभागाकडे (मुंबई) पाठविला आहे . 

मात्र हा प्रस्ताव पाठवून जवळपास पाच महिने झाले तरी अद्यापही हॉस्पिटलवर कायदेशीर कार्यवाही झालेली नसल्याचे सांगितले आहे. 
याउलट कोरोनाच्या या दुसऱ्या  लाटेत डॉक्टर आर डी शेंडगे यांच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर  उपचार करण्यात येत आहेत . सदरच्या रुग्णालात कोविड रुग्णावर उपचार करण्याचे आदेश दिलेच कोणी ?अश्यात याच रुग्णालयात  चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
इतके गंभीर प्रकरण असताना, शासन व लोकप्रतिनिधी या हॉस्पिटल मधील गैरप्रकार पाठीशी घालत आहेत . 


यामुळे शासनाच्या विविध आरोग्य योजना ,ज्या गोरगरीब रुग्णाच्या उपचारासाठी राबविल्या जातात . त्यात गैरव्यवहार करून,करोडो रुपयांचा अपहार केल्याचा उल्लेख  करुन सबंधित डॉक्टर व त्याला साथ देणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या कृत्याची  सीबीआय किंवा सीआयडी मार्फत चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करून सदरील हॉस्पिटलचा परवाना त्वरित रद्द करण्याची  मागणी शाहूराज माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 


निवेदनच्या प्रत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री,आमदार तानाजी सावंत ,जिल्हा शल्यचिकित्सक व पोलीस ठाणे यांना देण्यात आल्या आहेत .
 
Top