उस्मानाबाद, दि.७ 
 कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे रुग्ण संख्या  वाढत असल्याने शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांवर मोठा भार पडत आहे. परंतू आमदार प्रा. तानाजी  सावंत यांनी शासनाची कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता स्वखर्चातून बार्शी येथे १ हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करून ग्रामीण भागाच्या दृष्टीने या माध्यमातून चांगली व्यवस्था निर्माण केल्याचे   प्रतिपादन राज्याचे नगर विकास तथा सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


बार्शी येथील जेएसपीएम ग्रुप संचलित
भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयात एक हजार खाटांचे जम्बो कोविड केअर सेंटरचे  बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि .७ मे रोजी शुभारंभ करण्यात आला.  

यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार प्रा. तानाजी सावंत, राजेंद्र राऊत, ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रा. शिवाजी सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामल वडणे, बार्शीचे नगराध्यक्ष ॲड. असिफ तांबोळी, भाऊसाहेब आंधळकर, राजेंद्र मिरगणे, नगरपरिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके, गौतम लटके, प्रशांत चेडे, भूम नगर परिषदेचे संजय गाढवे, बार्शीचे तहसिलदार सुरेश शेरखाने, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, डॉ. दिग्गज दापके, केंद्र समन्वयक विकासरत्न प्रा. तानाजीराव सावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना मंत्री शिंदे म्हणाले की, बार्शी या ठिकाणी शिवसेनेचे आ. तानाजीराव सावंत यांनी सोलापूर व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सोयीसाठी बार्शीत कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील रुग्णांना उपचार घेण्यासाठी बेड मिळत नाहीत अशा तक्रारी यामुळे कमी होण्यास नक्कीच मदत मिळणार आहे. तसेच ‌या कोविड केअर सेंटरमध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून महिला रुग्णांसाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील फार मोठी अडचण दूर झाली असल्याचे सांगून ते म्हणाले की, या ठिकाणी सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. 


सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या रक्ताच्या वेगवेगळ्या ८ चाचण्या मोफत केल्या जाणार असल्यामुळे तात्काळ निदान होण्यास मदत होणार आहे. तसेच यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामध्ये देखील मोठा फायदा होणार असून रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी योगाच्या प्रशिक्षित शिक्षकांची देखील या ठिकाणी टीम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर हे सेंटर नैसर्गिक व मोकळ्या वातावरणात असल्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी जाण्यासाठी याचा सर्वात मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 


तसेच आ.‌सावंत यांनी अशा प्रकारची व्यवस्था करून शासनाला हातभार लावण्याबरोबरच सहकार्य केले असून ग्रामीण भागातील रुग्णांची सर्वात मोठी असलेली अडचण दूर होणार असल्यामुळे ही व्यवस्था रुग्णांना खरोखरच आरोग्यदायी दिलासा देणारी ठरणारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
 
Top