नळदुर्ग,दि.७: 
 तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या  बोरमण तांडा  येथे पिण्याच्या पाण्यासाठी एकच जुनी बांधकाम केलेली टाकी असून या टाकीत  बोअरवेलचे पाणी सोडण्यात येते. ते आपुरे पडत असल्याने  याठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली आहे.

  जवळपास एक हजार ते बाराशे लोकसंख्या असलेल्या या बोरमण तांड्यातील पाण्याच्या एकाच टाकीवर ,पाणी भरण्यासाठी महिला व नागरिकांची  मोठी गर्दी होत होती.ही बाब मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा जळकोट ग्रामपंचायत सदस्य प्रशांत नवगिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी या ठिकाणी नुकतीच भेट देऊन पाहणी केली व याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत ग्रामविकास अधिकारी यांना सूचना दिल्या .ग्रामविकास  अधिकारी  जि.के. पारे यांनी तातडीने यंत्रणा राबवून नवगिरे यांच्या सूचनेनुसार नवीन पाण्याची टाकी व पाईपलाईनची व्यवस्था केली.

प्रशांत नवगिरे यांनी स्वतः समोर थांबून पाईपलाइनचे खोदकाम करून घेतले व नवीन टाकी बसवून घेऊन पाणीपुरवठा सुरू केला.यामुळे जुन्या पाण्याच्या टाकीवरील भार व गर्दी कमी झाली.परिणामतः लोकांना पाण्यासाठी दूरवर रांगा लावायची गरज उरली नाही.


प्रशांत नवगिरे यांच्या या कार्याचे जळकोट,बोरमण तांडा आणि परिसरातील नागरिकांतून कौतुक होत आहे.
 
Top