तुळजापूर, दि. १३ : डॉ. सतीश महामुनी
तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार कोरोना कोव्हीड निर्मूलनासाठी विहित कालावधी निश्चित करून दिलेला असताना काही व्यापारी  वेळेनंतरही आपली दुकाने उघडी ठेवून साहित्य विक्री करताना नगरपरिषद पथकास आढळून आल्याने  एकूण   ५ दुकांनावर व विनामास्क फिरणा-या व्यक्तीवर   दंडात्मक कारवाई करुन सुमारे १० हजार  रुपये वसुल करण्यात आले. या कारवाईने शहरात नियमाचे उल्लंघन करणा-यांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईत तुळजापूरातील आर्य चौक येथील ओम मैचवेल, तुळजाई लेडीज वेअर तसेच मंगळवार पेठ येथील श्री.बाळेश्वर टेक्सटाइल या दुकानाचा समावेश होता.   रस्त्यावरून  विनाकारण विनामास्क फिरणाऱ्या १३ व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. आज केलेल्या सर्व कार्यवाहीमध्ये  एकूण १० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

 शिवाय विनाकारण फिरणाऱ्या ५  व्यक्तीवर कोवीड तपासणी केंद्रावर तपासणीही केली.  या कार्यवाही मध्ये स्वत: मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्यासह कार्यालय अधीक्षक वैभव पाठक,  संतोष इंगळे,ज्ञानेश्वर टिंगरे,नागेश काळे, सज्जन गायकवाड, बापू रोचकरी, अण्णा पारधे, विश्वास  मोटे  आदी कर्मचारी सहभागी झाले होते.  


तुळजापूर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये. कोरोना आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी आशिष लोकरे व सर्व नगरपरिषद सदस्यांनी सदर प्रसंगी सर्व नागरिकांना केले आहे.
 
Top