अणदूर,दि.२४
तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वत्सलानगर,सिद्धार्थ नगर,बसवेश्वर नगर,बजरंग नगर आदी भागातील नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत स्वतंत्र लसीकरण केंद्र करून लसीकरण करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायत अंतर्गत तीन तांडे व वत्सलानगर हा भाग येतो,अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र व वत्सलानगर मधील अंतर जवळपास एक ते दीड किलोमीटर आहे. येथील जास्तीत जास्त नागरिक हे शेती व शेतीची कामे करणारे आहेत.या भागातील नागरिकांनी लोकसंख्या ही जवळपास ७ ते ८ हजार पेक्षा अधिक आहे.
ही लोकसंख्या पाहता येथे आपले आरोग्य उपकेंद्र पण मंजूर झालेले आहे.आता पर्यंत घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात या भागातील नागरिकांना म्हणावी त्या प्रमाणात लस मिळाली नाही. त्याचे कारण लसीकरण व या भागातील अंतर हे ही असू शकते.त्यामुळे या भागातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत अणदूर प्राथमिक केंद्रांतर्गत स्वतंत्र लसीकरण मोहीम घेतल्यास याचा फायदा होऊन जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ होईल. तसेच नियमित लसीकरणासाठी होणारी प्रचंड गर्दी पाहता अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अपंगांसाठी स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करणे गरजेचे आहे.
तरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या अर्जाची दखल घेऊन स्वतंत्र लसीकरण व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य डॉ जितेंद्र कानडे यांनी केली आहे.