उमरगा,दि.२४ :
शहरातील मान्सूनपूर्व कामे करून घ्यावीत पावसाळा तोंडावर आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उमरगा शहरातील सर्व लहान व मोठ्या नाल्यांची सफाई व इतर मान्सूनपूर्व कामे करून घ्यावीत अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांनी मुख्याधिकारी , उमरगा नगर परिषद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


पत्रात म्हटले आहे की, मागील सलग 3 वर्षे उमरगा शहरातील म्हात्रे नाला, एकोंडी रोड, पतंगे रोड, शिवपुरी रोड, आरोग्य नगर, ओ.के. पाटील नगर, मुळज रोड, या भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले होते. तसेच अनेकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान झाले होते. 

तसेच यंदा नव्याने झालेल्या पतंगे रोडची उंची वाढल्यामुळेही अनेक घरे व दुकानांत पाणी शिरण्याची शक्यता आहे.


तरी वरील सर्व बाबींचा विचार करून नगर परिषदेने तात्काळ मान्सूनपूर्व कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर शिवसेना गटनेते संतोष सगर, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नगरसेविका प्रतिभा (ताई) चव्हाण, नगरसेविका जयश्री चव्हाण, संदीप चव्हाण यांच्या सह्या आहेत.
 
Top