उमरगा,दि.२७ :  

खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी बांधवांनी शेतीतील अंतर्गत मशागतीची व इतर पेरणीपूर्व कामे पूर्ण  करून पेरणीसाठी लागणारे साहित्य, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू केलेली आहे. 


या अनुषंगाने आज आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव यांच्यासमवेत बैठक घेऊन, शेतकऱ्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच कृषी निविष्ठाधारकांकडून कृत्रिम टँचाई निर्माण करून बियाणे व खते अधिकच्या दराने विकण्याचा प्रकार घडून शेतकऱ्यांची लूटमार होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या.

बैठकीत कृषी निविष्ठाधारक यांनी महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे मागणीपेक्षा कमी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानुसार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांना लेखी पत्र देऊन, गतवर्षी उमरगा तालुक्यात काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसे बियाणे उपलब्ध नाही. यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत अधिकचे बियाणे तात्काळ व मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे.

बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, तालुका कृषी अधिकारी सुनील जाधव, उमरगा तालुका फर्टिलायझर असोसिएशनचे सचिव लक्ष्मीकांत माणिकवार, शिवसेना विधानसभा संघटक शरद पवार, शेतकरी प्रतिनिधी शरद इंगळे आदी उपस्थित होते.

शेतकरी बांधवांतून केवळ महाबीज कंपनीच्या बियाणांची मागणी होत आहे. परंतु सध्या बाजारात MAUS  71, MAUS 158, MAUS 162, MAUS 612, KDS 726 , KDS 753 हे अधिक उत्पादन देणारे सुधारित वाण आलेले आहेत.
तरी शेतकरी बांधवांनी हे सुधारित वाण वापरून अधिक उत्पन्न घ्यावे, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी यांनी केले.
 
Top