तुळजापूर, दि. ०३
तुळजापूर शहरात नियमाचे उल्लंघन करणा-या विरूध्द प्रशासनाची धडक कारवाईत शारिरीक अंतर नसणे, विना मास्क, वेळेपेक्षा जास्त कालावधीत दुकान उघडे ठेवणे आदी कारणाने नियमाचे उल्लंघन करणा-या विरूध्द दुकान सिल करण्यात आले, आणि दंडात्मक कारवाई करून जवळपास ५ हजार दंड वसूल केले.
नगरपरिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये सोमवार दि 3 मे रोजी तुळजापूर शहराच्या विविध भागांमध्ये दोन पथकामार्फत फिरून विना मास्क आढळणा-या विरूध्द दंड आकारणी, तसेच वेळेपेक्षा जास्त कालावधीत दुकान उघडे ठेवणे या कारणामुळे दंडाची आकारणी करण्यात आली.
त्यापैकी एक पथक कार्यालय अधिक्षक वैभव पाठक यांच्या नियंत्रणात तर दुसरे पथक वैभव अंधारे यांचे नियंत्रणात कार्यरत होते. यावेळी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तुळजापूर जवाहर गल्ली येथील कृष्णा दुध डेअरी सिल करण्यांत आली. श्री.तुळजाभवानी मंदिर समोरील प्रसादिक भांडार जागा मालक यांना एक हजार रुपये दंड व तेथील भाडेकरु रमेश हुंबे यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच मुथूट फायनान्स कंपनी यांनी सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याने व विना मास्क खातेदार फायनान्स मधे दिसून आल्यामुळे त्यांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात आला. शिवाय शहराच्या विविध भागांमध्ये विना मास्क फिरणारे 9 व्यक्ती यांना प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे एकूण 1800 रुपयाची दंडाची आकारणी करण्यात आली. सदर मोहिमेमध्ये सर्वश्री खालेद सिद्दिकी, संतोष इंगळे ज्ञानेश्वर टिंगरे, विश्वास मोटे, दत्ता डोंगरे व इतर कर्मचारी यांनी भाग घेतला. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी मार्गदर्शन केले.