तुळजापूर, दि. २९ डॉ. सतीश महामुनी
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरामध्ये दररोज हजारो भाविकांची गर्दी असते , यानिमित्ताने तुळजाभवानी मंदिराशी निगडित पुजारी आणि व्यापारी हे सतत आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात. मात्र लॉकडाऊनमुळे यासर्व मंडळींना चार भिंतीमध्ये एकांतवासात बसणे अशक्य झाले आहे. जवळपास सर्व घरांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निदर्शनास येत आहे.
आई राजा उदो, उदो, सदानंदीचा उदो , उदो या जयघोषात शेकडो भाविक भक्तांना तुळजाभवानी देवीचे दर्शन झाल्यानंतर मंदिर परिसरातील दुकानांमध्ये उपाहारगृहे आणि प्रासादिक भांडार येथून खरेदी करण्यासाठी वावरावे लागते. यासाठी येथील व्यापारी दिवसातील बहुतांश वेळ आपल्या दुकानांमध्ये राहून दुकानदारी करत असतात.
सतत व्यस्त असणारा या वेळापत्रकामध्ये सुट्टी हा विषय जवळपास नसल्यासारखा असतो ज्यांना त्याची गरज आहे, अशी मंडळी पर्यायी व्यवस्था करून सुट्टी देखील घेतात, मात्र अनेकजण या सर्व व्यापाराचा मोठा ताण लक्षात घेऊन व्यापारावर सतत लक्ष केंद्रित करून जास्तीत जास्त वेळ दुकानांमध्ये घालवतात.
मात्र कोरोना संसर्ग परिस्थीती निर्माण झाल्यापासून गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत या सर्व गंभीर परिस्थितीमध्ये ही व्यापारी मंडळी अवघडल्यासारखी वावरत आहेत. त्यांना व्यापार करण्याची एवढी सवय झालेली आहे, की ते घरामध्ये एकांतवासात बसू शकत नाहीत, त्यामुळे सर्व तरुण व्यापारी आपापल्या शेताकडे वळून शेतातील कामे करताना दिसत आहेत. अगदी जनावरांना चारा घालण्याची देखील त्यांना सवय झाली आहे. शुद्ध हवा आणि शरीराला कष्ट या दोन्हींमुळे आरोग्य निरोगी राहील. हा त्यामागील सर्वांचा हेतू आहे. याशिवाय एकांतवासात बसण्यापेक्षा तो वेळ शेतात दिल्यामुळे त्यांना शेतीची आणि शेती कामाची गोडी लागली आहे. भल्या सकाळी दुचाकी आणि चारचाकी गाड्या बाहेर काढून ही मंडळी शेताकडे रवाना होतात आणि सायंकाळी पुन्हा आपल्या घरी परततात अशी सर्वसाधारण तुळजापूर शहरातील व्यापारी आणि उद्योजक यांची दिवसभराची दिनचर्या ठरली आहे.
तुळजापूर येथील उद्योजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी दिवसभर आपला वेळ शेतामध्ये घालवण्याचा निर्णय पहिल्या पासून घेतलेला आहे. त्यांना शेतीमध्ये चांगली गोडी लागल्यामुळे ते दिवसभराचा आपला वेळ शेतामध्ये घालवत आहेत. त्यामुळे निरोगी आरोग्य आणि शेती कामाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.