नळदुर्ग , दि.२०
मुलाचा मृत्यु झाल्याचे समजताच ते सहन न झाल्याने आईनेही जगाचा निरोप घेत सोडले प्राण . ही घटना नळदुर्ग येथिल श्री.तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे घडली. ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नारायण शिवाजी राऊत वय ७० वर्ष , श्रीमती लोचनाबाई शिवाजी राऊत वय ९० वर्ष असे मृत्यु झालेल्या मुलगा व वयोवृध्द आईचे नाव आहे. यातील नारायण राऊत हा पूर्वी कारखाना सुरू असताना हॉटेलचा व्यवसाय करीत होता. मात्र काहीं वर्षापासून कारखाना बंद असल्याने हॉटेल व्यवसायही बंद पडला होता. राऊत हा शेळया राखून व मजुरी करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करित होता.
दरम्यान मंगळवार दि. १८ मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घरातच अचानक नारायण राऊत यांचे निधन झाले.
घरातच असलेल्या त्याची वयोवृध्द आई लोचनाबाई यास मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दोन तासांनी म्हणजे 6 वाजण्याच्या सुमारास लोचनाबाई यांचेही मृत्यू झाले.
साखर कारखान्यावर स्मशान भुमी नसल्याने दुस-या दिवशी बुधवार दि. 19 मे रोजी सकाळी अणदुर येथे दोघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यू नंतरही प्रेताची अवहेलना झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तुळजाभवानी कारखान्यावर मधुकर नगर, हरिबा नगर व कारखाना वसाहात असून याठिकाणी दोनशे कुटुंबिये वास्तव्यास आहेत. याठिकाणी स्मशान भुमी नसल्याने येथील नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान येथे स्मशान भुमी करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.