लोहारा, दि. 3 :   
लोहारा  तालुक्यातील एका गावात येथे अल्पवयीन मुलीवर बापानेच  बलात्कार केला असून दोषींस तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, या मागणीचे लोहारा तालुका  जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने तहसीलदार संतोष रुईकर मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. 

 तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,  दि. २९ एप्रिल रोजी लोहारा तालुक्यातील आष्टा(कासार) येथे एका अल्पवयीन मुलीवर पित्यानेच बलात्कार करून वासनांधतेची परिसीमा पार केली आहे. काल परवा पर्यंत नात्या मधील इतर कोणी तर बाहेरच्या पैकी कुणी एकट्या दुकट्या मुलीला पाहून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटना ऐकिवित यायच्या. त्यामुळे स्त्रिया सुरक्षित नसल्याची जाणीव व्हायची.  परंतु बाप लेकीच्या नात्याला देखील काळीमा फासणारी घटना  म्हटले आहे.


सदर घटनेतील आरोपीने पीडित मुलीवर अनेकवेळा बलात्कार केल्याचे समजते.  परंतु सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडितेच्या आईने त्यावेळी सदर घटना झाकून ठेवली होती अशी माहिती पिडीतेकडून समजली असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 




 एकंदरीतच काय तर मुली, महिला, व स्त्रिया या कोणत्याही वयात, कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही परिस्थितीत, आणि कोणत्याही नात्यात देखील सुरक्षित नाहीत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आम्ही जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून कायम स्त्री अत्याचारा विरूद्ध आवाज उठवत आलेलो आहोत, अशा घटनांमध्ये आरोपीला अटक तर होते पण शिक्षा होईल की नाही याची खात्री देता येत नाही. कारण कायद्याच्या पळवाटा, पोलीस तपासातील दिरंगाई अशी कारणे दिसून येतात. आणि यदा कदाचित एखाद्या आरोपीला शिक्षा झालीही तरी ती शिक्षा सुनावन्यास व तिची अमलबजावनी होण्यास जो वेळ लागतो तो म्हणजे पिडीतेवर एक प्रकारचा अन्यायच म्हणावा लागेल कारण उशिरा मिळणारा न्याय हा न्याय ठरत नाही. आणि याचाच दुसरा परिणाम म्हणजे नराधमांना कायद्याचा धाक वाटत नाही. यासाठी आम्ही विधानभवनाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिशा कायदा लागू करावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून केली होती.  मुख्यमंत्री यांनी  देखील हा कायदा लागू करण्याची घोषणा अधिवेशनात केली होती.

    त्यामुळे या अतिसंवेदनशील अशा प्रकरणात या नव्या दिशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच  सदर प्रकरणातील आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तसेच गुन्हे देखील दाखल आहेत. या साऱ्या बाबींचा विचार करून सदर प्रकरण हे जलद गती नयायालयात चालवले जावे अशी  मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. 


या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष.रंजना श्रीकांत हासूरे,गोकर्णा कदम,प्रतिभा परसे, सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top