कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. लसीकरणासह विविध उपचार पद्धतीवर संशोधन केले जात आहे. कोरोना विषाणूचा संपूर्ण खात्मा करणारी एक नवी थेरपी विकसित केल्याचा दावा ऑस्ट्रेलियन संशोधकांनी केला आहे. जी कोविड-19 च्या कणांचा 99.9 टक्के नाश करण्यास सक्षम असून ते एखाद्या क्षेपणास्त्रासारखे काम करत असल्याची माहिती या संशोधनात सहभागी असलेले प्रा. निगेल मॅकमिलन यांनी दिली आहे.

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच या विषाणूचा नायनाट करण्यावर ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅण्डच्या मेन्झीज हेल्थ इन्स्टिटय़ूटच्या शास्त्रज्ञांकडून मागील काही महीन्यांपासून संशोधन सुरू होते. या संशोधनात शरीरातील कोरोनाच्या विषाणूंची ओळख पटवून त्यांच्यावर हल्ला करणारी एक नवी थेरपी विकसित करण्यात यश आले आहे. या थेरपीच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूस अटकाव केला जाऊ शकतो. त्याचबरोबर मृत्यूंचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला जात आहे.

ही थेरपी जीन-सायलेन्सिंग या वैद्यकीय तंत्रावर आधारित आहे. जीन-सायलेन्सिंग हे तंत्र श्वसनरोगावर उपचार करण्यासाठी आरएनए वापरते.
हे एक तंत्र असून आरएनएच्या लहान तुकडय़ासह काम करते. या उपचार पद्धतीमुळे विषाणूच्या जिनोमला अटकाव करते. त्यामुळे संसर्ग फैलावला जात नाही.
रेमडेसिवीर व अन्य औषधांमुळे कोरोनाची लक्षणे कमी होऊन रुग्ण बरे होण्यास मदत करते, परंतु ही उपचार पद्धती थेट कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी कार्य करते.
अशी आहे उपचार पद्धती

नॅनोपार्टिकल इंजेक्शनद्वारे हे औषध रक्तप्रवाहात सोडले जाते. नॅनोपार्टिकल्स फुप्फुसात प्रवेश करतात आणि पेशींमध्ये मिसळतात. जे आरएनए वितरित करतात. त्यानंतर आरएनए विषाणू ओळखतो आणि त्याचा जिनोम नष्ट करतो. ज्यामुळे विषाणूची प्रतिकृती निर्माण होत नाही. साभार - सामना
 
Top