उस्मानाबाद,दि.१५ : जिल्हयामध्ये दि.१७ मे २०२१ रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरीकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फन्ट लाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे. याकरीता जिल्हयामध्ये दिनांक १७ मे २०२१ रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये एक लसीकरण केंद्र कार्यान्वीत असणार आहे.
ज्या लाभार्थ्यांनी को विशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजेच ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस २२ फेब्रुवारी २०२१ पुर्वी घेतलेला आहे. केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.
सध्या जिल्हयामध्ये असे एकुण २०८३ लाभार्थी आहेत. शक्यतो लाभार्थ्यांनी ज्या ठिकाणी लसीचा पहिला डोस घेतला होता तेथेच दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दी टाळणे सोईचे होणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधारकार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे जेणेकरुन दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. या दिवशी कोविशिल्ड लसीचा केवळ दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांनाच लसीकरण केले जाणार असल्यामुळे याव्यतिरिक्त इतर नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये.
लसीकरणाची वेळ सकाळी ०९.०० वाजल्यापासुन सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत आहे. लसीकरण केंद्रावर एकुण दुसऱ्या डोससाठी देय असणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक प्रमाणात लस उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पुर्ण झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांकरीता लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधीत ठेवत लस घ्यावी. असे आवाहन करण्यात येत आहे.