तुळजापूर, दि. ८: डाँ. सतीश महामुनी
तुळजापूर तालुक्यामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची धावपळ होत आहे. लसीचा दुसरा डोस केव्हा मिळणार यासंदर्भात संदिग्धता निर्माण झाली आहे.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग, अणदूर, काटगाव, जळकोट, काटी, सावरगाव, मंगरूळ , आरळी यांच्यासह इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम शासनाच्या निर्देशाप्रमाणे सुरू आहे. यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तरीही त्यांना निश्चित दिनांक आणि वेळ दिला जात नाही.
त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या वतीने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती देण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कक्ष वाढवावेत, त्यामुळे नागरिकांच्या रांगा लागणार नाहीत आणि गर्दी होणार नाही नोंदणी करण्यासाठी एक टेबल असल्यामुळे आणि इंटरनेटची व्यवस्था कमी-जास्त होण्याच्या प्रमाणामुळे नागरिकांना जास्तीत जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागते आणि हे संसर्गाच्या अनुषंगाने चुकीचे आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुळजापुरात पाच कक्ष सुरू करावेत म्हणजे गर्दी होणार नाही. असाही मतप्रवाह लस घेणाऱ्या नागरिकांचा आहे. यामध्ये महिलांच्या रांगा आणि पुरुषांच्या रांगा असे देखील केल्यास होणारा त्रास कमी होईल.