काटी,दि.११ : उमाजी गायकवाड
कोरोना संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता देशभरासह उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस दल दिवस-रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत.
सध्या संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी गोरगरीब नागरिक जे दररोजच्या उपजिवीकेवर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. त्यांचेवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून वैदू समाजातील 15 कुटुंब पाल ठोकून राहत असून गावोगावी भटकंती करुन चाळण्या, टोपली, भंगार गोळा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.
परंतु लॉकडाऊन सुरु असल्याने त्यांची संपूर्ण भटकंती बंद पडली आहे. पर्यायाने त्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने या दुर्लक्षित घटकातील 15 कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व सरपंच रामेश्वर तोडकरी यांनी याची दखल घेत त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये, या हेतूने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये कर्तव्यावर राहुन सुध्दा सपोनि सचिन पंडित व सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी जोपासत सोमवार दि. 10 रोजी त्या 15 कुटूंबांना मान्यवरांच्या उपस्थितीत गहु, तांदूळ, तेल, दाळ आदी साहित्य असलेल्या किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन कालावधीत झालेल्या या मदतीमुळे या कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सपोनि सचिन पंडीत, सरपंच रामेश्वर तोडकरी,उपसरपंच आनंद बोबडे पोलीस पाटील समाधान डोके, शंकर शिंदे,भागवत डोलारे, परमेश्वर काळदाते,नेताजी कदम, सुरज ढेकणे, बाळासाहेब डोके, महेश गवळी, राजकुमार बोबडे, राजाभाऊ ठाकूर आदीजण उपस्थित होते.