लोहारा,दि.१४ :
शहरातील ग्रामीण रुग्णालयात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉ. सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. काळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी पञाद्वारे केली आहे.
राज्यमंत्र्यांना दिलेल्या पञात म्हटले आहे की, सध्या कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. लोहारा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात एकूण 510 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
लोहारा तालुक्यात दोन ग्रामीण रुग्णालये, चार प्राथमिक आरोग्य केंद्र सोडली तर इतर कोणतीही वैद्यकीय व्यवस्था नाही. तसेच एखादे मोठे खासगी रुग्णालयही नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराची मोठी गैरसोय होत आहे.
नॉर्मल असलेल्या रुग्णांना लोहारा येथील कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. परंतु ज्यांची परिस्थिती गंभीर आहे, अशा रुग्णांना उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद याठिकाणी नेण्यात येते. परंतु सध्या तिथेही रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याने बेड उपलब्ध होणे अवघड झाले आहे. त्यामुळे लोहारा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, कोनसेंट्रेटर व एम. डी. वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता झाली तर येथेच उपचार करता येतील. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच लोहारा तालुक्यात डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डी सी एच सी ) उभारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून संबंधितांशी बोलून सदरील सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य मंञी संजय बनसोडे यांच्याकडे केली आहे.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, आदि उपस्थित होते.