लोहारा ,दि.२३
करोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे लोहारा तालुक्यातही आरोग्य यंत्रणेवर खूपच ताण आलेला आहे. ऑक्सिजनची गरज पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा कठीण परिस्थितीत ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेने मदतीचा हात पुढे केला असून संस्थेमार्फत ग्रामीण रुग्णालय लोहारा येथे पाच ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले.
त्यामुळे आता अधिक गरजू रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करता येईल. या प्रसंगी रुग्णालयाचे अधिक्षक साठे, तालुका आरोग्य अधिकारी अशोक कटारे , संस्थेचे केंद्रप्रमुख अभिजित कापरे, जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत पाटील, आरोग्य समन्वयक सचिन सूर्यवंशी आणि संतोष येवले आदी उपस्थित होते.
संस्थेचे कार्यकर्ते हराळीमध्ये घरोघरी जाऊन तापमान व ऑक्सिजन तपासणी करून कोविड संबंधात माहिती देत आहेत. तसेच कोविड शिवाय अन्य आजार असणाऱ्या रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी मोफत टेलीमेडिसिनद्वारा उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्रातील डॉक्टर यासाठी मदत करत आहेत. तसेच लसीकरणाचे महत्व आणि आवश्यकता याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
याचाच परिणाम म्हणून हराळी गावातील 187 लोकांनी लस घेतली आहे. यासाठी संस्थेमार्फत वाहनांची व्यवस्था ही केली जात आहे. येत्या काळात इतर गावातही अशीच सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी व्हावा आणि रुग्णांना गावाजवळच रहाता यावे, या उद्देश्याने 25 रुग्णक्षमतेचे कोविड विलगीकरण केंद्र ज्ञान प्रबोधिनी हराळी संस्थेत सुरु करण्यात आले आहे. रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी पाणी, स्वच्छता, औषधे अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लोहारा येथील कोविड केंद्रासाठी संस्थेने 100 बेड्स दिले आहेत. परिसरातील इतर कोविड केंद्रांनाही संस्थेमार्फत आवश्यक ती मदत केली जात आहे.