मुरुम, दि. २६
कोरोनामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्ण व नातेवाईकांची लॉकडाउनमुळे जेवणाची मोठी अडचण होत असल्याने काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या संकल्पनेतून उमरगा तालुक्यातील मुरूम येथील विठ्ठलसाई कारखान्यावरील कोविड सेंटरला दररोज शंभर जणांना पुरेल एवढया जेवणाची व्यवस्था सुरु आहे.
दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारच्या सत्रात कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्ण व नातेवाईकांपर्यत जेवणाचे डब्बे नियमित पोहचविले जात आहेत. ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक वेगाने वाढली आणि अनेकांना त्याची बाधा झाली. गरीब कुटुंबातील अनेक रुग्णांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणींना तोंड दयावे लागत असल्याने बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करून कोरोनासंदर्भात जी-जी मदत करता येईल ती-ती सुरू करण्यास सांगितले.
कार्यकर्त्यांनी देखील उपचारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. उपचारासाठी दाखल झालेल्या परिसरातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवणासाठी होणारे हाल व अडचण लक्षात घेऊन तालुका काँग्रेसकडून गेल्या एक मे पासून ते आजपर्यंत आठशे जणांना नियमित कार्यकर्ते जेवणाचे डब्बे पुरवित आहेत.
मुरूम येथील आचाऱ्यामार्फत दररोज ८०० डब्बे तयार केले जातात. त्यापैकी ४०० डब्बे उमरगा, ३०० डब्बे लोहारा येथील कोविड सेंटरला जातात तर उर्वरित १०० डब्बे मुरुम येथील कोविड सेंटर पाठविले जातात. सदर जेवणाच्या डब्याची तयारी पहाटेपासूनच नियोजनबध्द पध्दतीने सुरु असते.
स्वच्छतेची काळजी घेऊन, पाच ते सहा पदार्थ असलेले पोष्टीक आहारसह सकाळी अकरानंतर जेवणाचे पार्सल डब्बे वाहनातून थेट रुग्णालयापर्यंत पोहचविले जातात. अन्नदानाच्या प्रक्रियेत कुठलीही अडचण येवू नये म्हणून बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील लक्ष ठेऊन आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, तालुका काँग्रेस समितीचे तालुकाध्यक्ष अँड.सुभाष राजोळे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, अनिता अंबर, पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, सरपंच गोविंद पाटील, उल्हास घुरघुरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पवार, नगरसेवक विक्रम मस्के, महेश माशाळकर, विजय वाघमारे आदींनी याकामी पुढाकार घेतला आहे. राहूल वाघ, श्रीकांत बेंडकाळे, राम डोंगरे, सुधीर चव्हाण, घौस शेख, राजु मुल्ला, शिवराज सोलापूरे आदी कार्यकर्ते मुरूम येथील कोविड सेंटरला जाऊन दररोज शंभर जेवणाच्या डब्याचे वितरण करत आहेत.
बसवराज पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे बाधीत झाली आहेत. अनेक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. बाधितांची संख्या या भागात दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी पाटील कुंटूबीय या परिसरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. माणुसकीच्या भावनेने आम्ही कोरोना नातेवाईकांना दोन घास अन्नाचे खाऊ घालू. या भावनेतून सदरची अन्नदानाची मोहिम आम्ही हाती घेतली आहे. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळण्याकरिता राज्यात महाविकास आघाडी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाने गंभीर झालेल्या अनेक रुग्णांच्या उपचाराचा खर्च महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतून केला जातोय. प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यभर रक्तदान शिबीरे घेऊन रक्तसंकलन केले, त्याचा अनेकांना फायदा होतोय. उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्ण व नातेवाईकांना जेवणाचे डब्बे गेल्या २५ दिवसापासून अविरतपणे पोहचविले आणि पुढेही चालू ठेवतील.