उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील वीर हुतात्मा गणपतराव देशमुख यांचा 5 मे हा दरवर्षी स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.
15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या जोखडातून भारताला स्वातंत्र्य मिळाले असले तरी संस्थानिकांनी व्यापलेला फार मोठा भूभाग पारतंत्र्यात च होता. हैदराबाद, काश्मिर, जुनागढ यासारख्या जवळपास सहाशे छोट्या मोठ्या संस्थानचा प्रदेश इंग्रजांच्या धुर्तनितीमुळे भारतीय संघ राज्यात विलीन झाला नव्हता. त्यामुळे लॉर्ड माऊंट बॅटन योजनेनुसार 15 ऑगस्ट 1947 ला खऱ्या अर्थाने भारताचा दोन तृतीयांश भाग स्वतंत्र झाला होता. इंग्रजांनी भारतीय संस्थानिकासमोर हिंदुस्थान व पाकिस्तानात विलीन होण्याच्या पर्यायाबरोबरच स्वतंत्र राहण्याचा पर्याय ठेवला. या पर्यायामुळे हैद्राबाद, काश्मिर, जुनागढ घ्या संस्थानिकांनी स्वतंत्र राहण्याचा पर्याय स्वीकारला. मात्र या तिन्ही संस्थानांतील जनतेची इच्छा भारतीय संघ राज्यात विलीन होण्याची असल्यामुळे त्यांची प्रचंड उठाव केला.त्यामुळे काश्मिर व जुनागढ हि संस्थाने थोड्याफार प्रतिकारानंतर लवकरच भारतात विलीन झाली.
परंतु हैदराबाद संस्थानच्या बाबतीत तसे न घडता तेथील जनतेला सतत 13 महिने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध निकराचा लढा द्यावा लागला.
स्वतंत्र भारतात विलीन होण्याची चळवळ जोरात सुरू केली होती. या चळवळीला पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, भारती, गोविंदभाई श्रॉफ, देवसिंग चव्हाण, विनायकराव विद्यालंकार, भाई उद्धवराव पाटील, दिगंबरराव बिंदू, गणपतराव उर्फ गणेशराव देशमुख, नरसिंग राव देशमुख, यांनी स्वतंत्र होण्यासाठी हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील जनतेला प्रोत्साहन दिले. हुतात्मा गणपतराव देशमुख भुमिगत राहुन स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन देत होते. गणपतराव देशमुखांनी सातवी पर्यंतचे शिक्षण तुळजापूर येथे प्राविण्य मिळवून पुर्ण केले. त्यांनी गुप्तपणे गावातील व शेजारच्या गावातील तरुणांना हैद्राबाद मुक्तीसंग्राम विषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांच्या प्रभावाने काटीतील बाबुराव साळुंके, हिराचंद विभुते, जनार्दन यशवंतराव पाटील देगाव, सोपान मारुती भोसले धामणगाव, दत्तु कृष्णात जाधव धामणगाव, चंद्रकांत तात्यासाहेब जाधव धामणगाव, किसन निवृत्ती भोसले राळेरास, आदी तरुणांना त्यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन केले. 1947, 48 ला हैद्राबाद स्टेशन मध्ये मोठा दुष्काळ पडला होता.
त्यावेळेस तुळजापूर तालुक्यात बरीच लेवी जमा होत असे. काटी भागातील लेवी गणपतराव देशमुख यांच्या ताब्यात होती.त्या लेवीचा उपयोग गणपतराव देशमुखांनी उपाशी पोटी असलेल्या जनतेला वाटण्यासाठी केला. ज्वारी अंबार खुले केले व गोरगरीब जनतेची उपासमार थांबवण्यासाठी मदत केली.याचाही राग निजामाला होता. या सर्व गोष्टींचा परिणाम रजाकारावरती झाला व त्यांनी गणपतराव देशमुखांचा काटा काढण्याचे ठरविले.
रझाकार चळवळीमध्ये लातूर भागातील काही हिंदू लोकही रझाकार मध्ये सामील झाले होते. त्या सर्व रझाकाराने गणपतराव देशमुखांना जिवे मारण्याचा कट केला.याची कल्पना गणपतराव देशमुखांना असल्या कारणाने 30 एप्रिल 1948 ला आपला मुलगा शिवाजीराव देशमुख यांच्या बरोबर जेवत असताना ते मुलाला म्हणाले "एक ना एक दिवस मला मल्लप्पा धनशेट्टी सारखे हुतात्मा व्हावे लागेल" ही जणू त्यांना मिळालेली पुर्व सुचनाच असावी. दि. 4 व 5 मे च्या मध्यरात्री 2 वाजनेच्या सुमारास घरी झोपलेल्या ठिकाणी रझाकारांनी गणपतराव देशमुखांवरती गोळ्या झाडल्या व त्यांचा खुन केला. ते भारत देशासाठी हुतात्मा झाले. तेव्हापासून 5 मे हा दिवस हुतात्मा गणपतराव देशमुख स्मृतीदिन म्हणून साजरा केला जातो.