पोलीस ठाणे, आनंदनगर: जालना शहरातील कारखान्यातून सुमारे 20 मेट्रीक टन लोखंडी सळई घेउन ट्रक क्र. एम.एच. 09 एल 7063 हा दि. 12 जून रोजी सांगलीकडे जात होता. दरम्यान रात्री 23.55 वा. वडीगोदरी, ता. अंबड येथील रस्त्यावर ट्रकची गती कमी असल्याची संधी साधुन दोघे चोरटे ट्रकच्या पाठीमागील बाजूने ट्रकवर चढले. ट्रकच्या केबीनवरुन त्यांनी चालकाच्या काचेसमोर टारपोलीन सोडल्याने ट्रक चालकास रस्ता दिसु न लागल्याने टारपोलीन बांधण्यासाठी त्याने ट्रक थांबवला. ट्रक थांबताच अज्ञात चौघा पुरुषांनी ट्रकच्या केबीनमध्ये घुसून चालकास धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहान केली आणि त्याचे हातपाय बांधुन त्यास रस्त्याबाजूस सोडून दिले.
हे चौघे तो ट्रकसह चालकाजवळील 15,000 ₹ रक्कम व चालकाचा भ्रमणध्वनी घेउन पसार झाले होते. ट्रक चालकाने सुटका करुन घेउन गोंदी पोलीस ठाणे गाठून हा प्रकार पोलीसांना सांगीतला. यावरुन गोंदी येथे गु.र.क्र. 209 / 2021 हा दाखल करण्यात आला. या लुटीची माहिती उस्मानाबाद जिल्हा पोलीसांना प्राप्त होताच रात्र गस्तीस असलेली पोलीस पथके सतर्क झाली.
नमूद ट्रक रात्री 04.00 वा. सु. शिंगोली शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन उस्मानाबादकडे जात असल्याचे आनंदनगर पो.ठा. च्या पोना- गंगावणे, गोबाडे यांना दिसताच त्यांनी तो ट्रक पाठलाग करुन थांबवून ट्रक व त्यातील चालक- अनिल सुरेश मंजुळे, रा. शिंदेवाडी (सारोळा) यांस लुटीनंतर अवघ्या 4 तासांत ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याजवळ पोलीसांना धारदार शस्त्र कत्ती आढळून आले. या प्रकारा विषयी जालना पोलीसांना कळवण्यात आले असुन नमूद आरोपीसह ट्रक जालना पोलीसांच्या स्वाधीन केला जाणार आहे. तसेच कत्ती हे धारदार शस्त्र अवैधपणे बाळगून शस्त्र कायदा कलम- 4 / 25 चे उल्लंघन केल्याबद्दल नमूद चालकाविरुध्द आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.