तुळजापूर, दि. ८ :डॉ. सतीश महामुनी
लसीकरणासाठी नवीन जागा निश्चित करण्यासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे समिती सदस्य आनंद कंदले यांनी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांची भेट घेऊन येथील वीरतपस्वी मंगल कार्यालय येथे लसीकरण करण्यासाठी चर्चा केली.
उपजिल्हा रुग्णालय येथे एकाच वेळी 45 वर्षावरील नागरिक आणि 18 वर्षावरील नागरिक यांचे लसीकरण करणे अशक्य असल्यामुळे दुसरे एक पर्यायी लसीकरण केंद्र म्हणून वीरतपस्वी मंगल कार्यालय याचा उपयोग करावा, यासाठी यापूर्वी रुग्ण सेवा समितीचे सदस्य आनंद कंदले यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सोमवारी कुलदीप मिटकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
कंदले यांनी गेल्या दीड वर्षापासून या आपत्तीच्या काळात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने सहकार्य करत आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. लसीकरण सुरू झाल्यानंतर जागेची कमतरता आणि शासनाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी समाजातील दानशूर व्यक्ती कडून लसीकरणाच्या कार्यक्रमाला सहकार्य मिळवले तसेच सर्व वयोगटातील लसीकरण करण्यासाठी जागेची कमतरता लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर असणाऱ्या वीरतपस्वी मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.