तुळजापूर ,दि.२१ :
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे अवैध दारुविक्री विरोधात उमेद महिला गटाच्या रणरागिणी अखेर मैदानात उतरल्या असून ग्रामपंचायत समवेत बैठक घेऊन, या अवैध धंद्यांवर वेळीच लगाम घालावा अन्यथा महिलांच्या वतीने आक्रमक भुमिका घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
किलज ता. तुळजापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शनिवारी रोजी यासंदर्भात गावातील सर्व उमेद गट आणि ग्रामपंचायत यांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी गावात बोकाळलेल्या अवैध दारुविक्री, सिंदी विक्री मुळे संसार कसे उध्वस्त होत आहेत आणि तरुण पिढी सुध्द यामुळे कशाप्रकारे लयास जात आहे. याची चर्चा करण्यात आली. तसेच यापुढे गावात कोठेही कोणीही अवैध दारु विक्री करु नये अन्यथा कायदेशीर कारवाईबाबत आक्रमक भुमिका घेण्याची शक्यता वर्तवली.
अवैध दारुविक्री विरोधी घेण्यात आलेल्या बैठकीस महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांची माञ अनुपस्थिती होती. 'गावातील वाढते अवैध धंदे ही कित्येकांचे संसार उघड्यावर पाडणारी समस्या बनली आहे. यात उध्वस्थ होते ती प्रथमत: स्ञी' ही जाणीव ठेवून सरपंच व उपरसपंच बैठकीस उपस्थित राहणे जबाबदारीचे होते. परंतू तसे न झाल्याने उपस्थित महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी पोलीस पाटील सुनिता मर्डे, श्री. स्वामी समर्थ उमेद ग्रामसंघाच्या सी. आर.पी. जगदेवी शेळके, परवीन जमादार, रमाबाई गायकवाड, प्रियंका शिंदे, सुनिता पांचाळ, निता गवळी, जोत्स्ना ढाले, इंदुबाई ढाले, बायडाबाई गवळी, फुलाबाई गवळी आदी महिला तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.