लोहारा दि . ३०
तालुक्यातील सर्व ग्रामसेवकाना मुख्यालय राहण्यासाठी सक्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आयुब शेख यांनी ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ व गटविकास अधिकारी यांच्याकडे (दि.२९) निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामविकास मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हंटले की, लोहारा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रात्रीच्या वेळी कोरोना रुग्णाचा मृत्यु अथवा उपचारासाठी पाठविण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. ग्रामपंचायतकडुन कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीसाठी खर्च केला जात नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणच्या स्मशान भूमी, कब्रस्थान, यामध्ये जाण्यासाठी रस्ता, व दिवाबत्तीची सोय नसल्याने व सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने यामध्ये काटेरी झुडपे, साप, विंचू अन्य प्राणी यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर भविष्यात तालुक्यातील एकाही नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार शासन राहील. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णाची अंत्यविधी करताना रुग्णाच्या कुटूंबियांना नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे.
शासन धोरणानुसार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही जवळपास बहुतांश ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. ते लातूर, उस्मानाबाद व अन्य ठिकाणाहून येतात व मुख्यालयी राहत असल्याचे खोटे भासवून शासकीय भाडे घेतात व खोटा व बनावट भाडेपठा देऊन शासनाची लूट केल्याचे निदर्शनास येत आहे.
त्यामुळे याप्रकरणी गाव निहाय चौकशी करुन अहवाल मागवण्यात यावा, स्थळ पंचनामा करण्यात यावा व मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आयुब शेख यांची स्वाक्षरी आहे.