ताज्या घडामोडी


तुळजापूर, दि. १७: डॉ. सतीश महामुनी

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत मंदिर संस्थानचे सर्व विश्वस्त वेळकाढूपणा निष्काळजीपणा दाखवत असल्याचा आरोप एका निवेदनाद्वारे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे व ॲड. शिरीष कुलकर्णी यांनी  केला आहे.

जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. कौस्तुभ दिवेगावकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे  ॲड शिरीष कुलकर्णी यांनी म्हटले की,  तुळजाभवानी मंदिर संस्थांकडे वारंवार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याबाबत पाठपुरावा करत आहोत, यापूर्वी मंदिर संस्थानच्या वतीने 11 कोटी रुपये खर्च करून श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती उभारण्याचा मंदिर संस्थांनी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा आणि तो पैसा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी उपयोगात आणावा अशी निवेदनाद्वारे आपण विश्वस्त मंडळाकडे मागणी केली आहे. मात्र या मागणीकडे मंदिर संस्थानचे सर्व विश्वस्त दुर्लक्ष करीत असून कोरोना आपत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार कडून हॉस्पिटल उभारणीसाठी सहकार्य करण्याची भूमिका समोर आली होती. तरीही विश्वस्तांनी या संदर्भात तातडीची भूमिका न घेतल्यामुळे हॉस्पिटल उभारणीचा प्रश्न रेंगाळला आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये यासंदर्भात विश्वस्तांनी योग्य निर्णय न घेतल्यास याविषयी औरंगाबाद खंडपीठ मध्ये याचिका दाखल करून या संदर्भातील माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासमोर सादर केली जाईल असे निवेदनात नमूद केले आहे.

कोरोना आपत्तीमध्ये तुळजाभवानी देवीच्या भक्तासाठी आणि परिसरातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज निर्माण झाली , येथे नाममात्र दरात रुग्णावर उपचार होतील अशी अपेक्षा निर्माण झाली. परंतु यासंदर्भात कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या कोरोना संसर्ग मध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले.

जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार स्वामी  यांनी या विषयाच्या अनुषंगाने विश्वस्तांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे संस्थांच्या बैठकीमध्ये हा विषय मंजूर करून मार्गी लागेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या विषयाच्या अनुषंगाने विश्वस्तांची इच्छाशक्ती नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा ठपका निवेदनकर्त्यानी  ठेवलेला आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थांकडे 150 कोटी रुपये असून सोने-चांदी आणि इतर  वस्तू असल्यामुळे मंदिर संस्थान हॉस्पिटलसाठी खर्च करणे अवघड नाही. शिवाय तुळजापूर विकास प्राधिकरणाचे मधून बांधण्यात आलेल्या भक्तनिवासच्या इमारतींचा हॉस्पिटलसाठी उपयोग करता येणार आहे. महाराष्ट्रातील श्री गजानन महाराज संस्थानला राज्य सरकारने दहा कोटी रुपये हॉस्पिटलसाठी मदत केली. अशाच प्रकारची मदत तुळजाभवानी मंदिर संस्थांनला देखील होऊ शकते. शिवाय देशभरातील व जगभरातील भाविक भक्ताकडून हॉस्पिटलसाठी देणगी घेता येऊ शकते. 


त्यामुळे विश्वस्तांनी इच्छाशक्ती दाखवून लवकरात लवकर हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घ्यावा आणि कामाला सुरुवात करावी अशी मागणी निवेदनात केली असून या मागणीचा पंधरा दिवसात या कालावधीत विचार न झाल्यास सदर प्रकरण उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठ मध्ये दाखल करून या संदर्भातील माहिती राज्य सरकारकडे देणार आहोत असे  त्यांनी म्हटले आहे.

 
Top