तुळजापूर, दि. ३ :डॉ. सतीश महामुनी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी ६ जुन रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन विधिवत पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली आहे.
तुळजापूर शहराचे वैभव असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा चबुतरा नव्याने उभा करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने ७८ लाख रुपये खर्च करून कामाची सुरुवात करण्यात येत आहे. दि.६ जून रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते विनोद गंगणे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.
दोन वर्षापूर्वी चबुतरा बदलण्याच्या कारणावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणाच्या कामासाठी हलवण्यात आला. मात्र त्यानंतर या कामाकडे दिरंगाई झाल्यामुळे अनेक शिवप्रेमींनी नगरपरिषदेकडे या कामाचा पाठपुरावा केला. दरम्यान नगराध्यक्ष रोचकरी व युवक नेते विनोद गंगणे , पालिकेचे इतर नगरसेवक मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे यांनी नगरविकास खात्याकडे रीतसर प्रस्ताव पाठवून आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या विकास कार्यक्रमांमध्ये याचा समावेश करून ७८ लाख रुपये खर्चाला मंजुरी मिळवून आणली आहे. याशिवाय नगर विकास खात्याच्या विविध मंजुरी अल्पकाळात पालिकेने पूर्ण केले आहेत.
शहरातील शिवप्रेमींनी वेळोवेळी केलेल्या सूचना आणि मागण्यांचा विचार करून नवीन आराखडा तयार केला आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी सकाळी संपन्न होत आहे.