तुळजापूर, दि. १७ : डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर नगरपरिषदेच्या एकूण १९ प्रभागांमधील सर्वात आदर्श प्रभाग म्हणून तुळजापूर खुर्द या प्रभागाची जनतेमधून लोकप्रियता निर्माण झाली आहे . या प्रभागाचे नगरसेवक पंडितराव जगदाळे आणि नगरसेविका सौ. मंजुषा प्रसाद देशमाने यांनी तुळजापूर खुर्द प्रभागाचे आनंदवन केल्याची चर्चा नागरिकात आहे. 
नवख्या व्यक्तींना सुखद धक्का देणारी येथील स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ही खास गुणवैशिष्ट्ये आहेत.


नगरपरिषदेच्या सर्व प्रभागांमध्ये तुळजापूर खुर्द या प्रभागाचे सौंदर्य आणि स्वच्छता नीटनेटकेपणा ,त्याच बरोबर येथील नागरिकांचा नित्य व्यवहार यामुळे या प्रभागांचे आपले वेगळेपण निर्माण  झाले आहे. या प्रभागाचे नगरसेवक म्हणून मागील वीस वर्षापासून पंडितराव जगदाळे आपल्या स्वभावातील सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेची आवड यामधून तुळजापूर खुर्द प्रभागात शासनाच्या विविध योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर नेहमी प्रयत्नशील दिसतात. त्यामुळे या प्रभागात आठ सांस्कृतिक सभागृह अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये लोकांच्या उपयोगी पडत आहेत. तसेच १ कोटी ५ लाख रुपये किमतीचे नवीन अद्ययावत सभागृह तुळजापूर विकास प्राधिकरणाच्या मधून येथे बांधण्यात येत आहे. लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण होणार आहे.

 महाराष्ट्राच्या नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये नगरपरिषदेच्या एका प्रभागात ९ सभागृह बांधण्याचा तुळजापूर खुर्द प्रभागाचा विक्रम असावा. हे या प्रभागाचे नगरसेवक पंडितराव जगदाळे व सौ मंजुषा प्रसाद देशमाने यांचे यश आहे. यामध्ये काही संस्कृतीक सभागृहामध्ये मातीचा कण अथवा कचरा आढळणार नाही. जो इतर सर्व सांस्कृतिक सभागृह मध्ये सर्रासपणे पाहावयास मिळतो. कर्तव्यदक्ष नगरसेवक आणि आपले कर्तव्य जपणारे नागरिक यांच्यामुळे तुळजापूर खुर्द चे सौंदर्य व सुशोभीकरण कायम राहिले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार माणिकराव खपले यांनी तुळजाई संस्कृतीक मंडळाच्या कामांमध्ये सक्रिय असणारे तत्कालीन अध्यक्ष पंडितराव जगदाळे यांना नगरपरिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून पहिल्यांदा 2001 झाली संधी दिली आणि या संधीचे सोने करीत पंडित जगदाळे यांनी पुढील वीस वर्षांमध्ये तीन वेळा जनतेमधून निवडून येऊन तुळजापूर खुर्द प्रभागाचा कायापालट करून दाखवला खऱ्या अर्थाने करून दाखवण्याची जिवंत प्रतिक्रिया तुळजापूर खुर्द मध्ये पाहता येते. दीलीपराव देशमुख, मधुकरराव चव्हाण, सतीश चव्हाण, आमदार जोशी, या लोकप्रतिनिधींनी कडून विकास कामासाठी निधी उपलब्ध करून येते प्रभात विकास आणि नगरपरिषदेच्या शाळेचा विकास करण्यात आला आहे नगरपरिषदेच्या शाळेने राज्यस्तरावर आदर्श शाळा पुरस्कार देखील मिळवला डिजिटल वर्ग आणि शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करण्यात नगर परिषद शाळा क्रमांक 3 खूप मोठे यश मिळवले आहे प्रशालेचे शिक्षक आणि प्रभागाचे जाणकार नागरिक यांनी एकत्र येऊन या शाळे चा दर्जा आणि गुणवत्ता निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका ठेवली आहे चारशे पन्नास संख्या असणारे या शाळेमध्ये 250 विद्यार्थी तुळजापूर शहरातून शिक्षण घेण्यासाठी येतात यावरून या शाळेची गुणवत्ता आणि शिक्षकांच्या शैक्षणिक कष्टाची ओळख होते.


या सर्व विकास कामांमध्ये नगरसेवक म्हणून तुम्हाला कोणत्या कामाविषयी समाधान वाटते असा प्रश्न विचारल्यानंतर नगरसेवक पंडित जगदाळे यांनी सांगितले की तीव्र पाणीटंचाईच्या काळात तुळजापूर खुर्द चार लोकांची पाण्यासाठी खूप मोठी तारांबळ होत होती, त्यामुळे 2011 साली तुळजापूर विकास प्राधिकरणाचे मधून उद्धवराव पाटील शाळा घराच्या पाठीमागे पाण्याची टाकी निर्माण झाल्या नंतर येथील लोकांची तारांबळ कमी झाली ही समाधानाची बाब असून बोरी नदीची खोली करण्यासाठी चालवलेली चळवळ आणि त्यामुळे परिसरातील जलसाठा वाढण्या मध्ये झालेले मदत ही विशेष कामे आहेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामाला भेट देऊन कौतुक केले तसेच तुळजापूर खुर्द या प्रभागाच्या कामाच्या निमित्ताने सर्व जिल्हाधिकारी महोदयांनी उपस्थित राहून प्रकल्पाची पाहणी केली त्यामुळे येथील जनतेचा विश्वास संपादन करण्यात आम्हाला यश मिळाल्याचे सांगितले. 

तुळजापूर खुर्द अशा विकासाच्या अनुषंगाने नगरसेविका सौ मंजुषा प्रसाद देशमाने यांनी सर्वांनी एकजुटीने व एकमताने या विकासाच्या योजना राबवण्यासाठी एकमेकांना पाठबळ दिल्यामुळे हा प्रभाग सुंदर आणि बोलका झालेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सव्वा दोन कोटी रुपयांचा प्राधिकरणा मधून उस्मानाबाद हायवे तुळजापूर खुर्द हा मोठा रस्ता त्याचबरोबर लिंगायत समाज स्मशान भूमी व मुस्लिम समाज स्मशानभूमी त्यासाठी आवश्यक वेटिंग रूम ही कामे वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

 शिवरत्न नगर, साबळे प्लॉटिंग आणि पारधी वस्ती येथे लोकांची पाण्यासाठी होणारी तारांबळ लक्षात घेऊन घेण्यात आलेले बोअर व पाण्याची टाकी बांधकाम यामुळे लोकांना त्रास कमी होत आहे.  तुळजापूर खुर्द मध्ये लख्ख प्रकाश टाकणारे  ३ हायमस्ट बसविण्यात आल्यामुळे सर्वत्र 24 तास चांगला प्रकाश आहे. हायमस्ट दिव्या मुळे तुळजापूर खुर्द चे रात्रीचे देखणे वातावरण नवीन माणसाला भुरळ टाकणारे आहे.

खूप चांगली विकासाचे काम करण्यास येथील नगरसेवकांना यश मिळाले, कारण येथील साध्या आणि एकमेकांना सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे सहकार्य देखील या सर्व कामांमध्ये राहिलेले आहेत येथील जुन्या विहिरीचे अत्याधुनिक बांधकामामध्ये रूपांतर झाल्यानंतर या विहिरीने संपूर्ण गावाला पाणी देण्याचे काम चालवले आहे.   ही विहीर प्रेक्षणीय असून गावांमधील भिंतीवर रंगविण्यात आलेले सुविचार व प्रबोधनपर चित्र लोकांना आकर्षित करतात. जे जे काम नगरसेवक म्हणून या प्रभागात करता येईल त्यानुसार येथील नगरसेवकांनी काम केले आहे आणि त्याचा लाभ जनतेला होत आहे. हे सर्व चांगले काम पाहिल्यानंतर तुळजापुरातील इतर प्रभागांमध्ये अशा प्रकारचे काम का झाले नाही,  असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. नगरसेवक झाल्यानंतर कोणती कामे करावीत, याचा वस्तुपाठ नगरसेवक पंडित जगदाळे व नगरसेविका मंजुषा देशमाने यांनी घालून दिला आहे.
 
Top