काटी , दि . २७ :
तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 11 विद्यार्थी, विद्यार्थीनींना शनिवार दि.26 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा अंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे शाळा गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, शाळेपासून चार-पाच किलोमीटर अंतरावरील विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक मारुती घंदुरे यांच्या हस्ते मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गावातील शिक्षकप्रेमी लक्ष्मण वडवराव यांचे सहकार्य लाभले. या वेळी केरबा भालशंकर, नानासाहेब वडवराव तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मोफत सायकल वाटप योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थीनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.