जळकोट,दि.२० ,मेघराज किलजे  काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने आयोजित केलेल्या १० व्या  काव्यमहोत्सव प्रसंगी काव्यमहोत्सवाचे उद्घाटक म्हणून बोलताना पानिपतकार विश्वासराव पाटील म्हणाले, "प्राथमिक शिक्षकांची झेप खूप मोठी आहे, कुवतही मोठी आहे, समाजविकासाच्या दृष्टीने त्यांचे योगदान अमूल्य असून साहित्य क्षेत्राच्या संदर्भात बोलायचेच म्हटले तर आजपर्यंत होऊन गेलेल्या एकूण भारतीय साहित्यातील सत्तर टक्के साहित्य प्राथमिक शिक्षकांचे होते, आहे म्हणूनच भारतीय साहित्यात प्राथमिक शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे. " याबरोबरच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागा करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

       या १० व्या काव्यहोत्सवाच्या उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून मुंबईचे बेस्ट बुक सेलर लेखक तथा ज्येष्ठ कवी डॉ.मिलिंद शेजवळ हे उपस्थित होते.  प्रमुख अतिथी म्हणून इंडियन मॉडेल स्कूल संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा.ए.डी.जोशी, नंदूरबारचे सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ कवी प्रा.अशोक शिंदे तसेच मुंबईचे सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार विजय फडणीस हे उपस्थित होते. काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्यसचिव कालिदास चवडेकर, काव्यप्रेमी मार्गदर्शक बाळासाहेब तोरस्कर तसेच सौ.सीमा भांदर्गे यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय काव्यप्रेमी शिक्षक मंचचे सर्व विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्हा अध्यक्ष तसेच अनेक काव्यरसिकही उपस्थित होते.

          प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.ए.डी.जोशी यांनी "काव्यप्रेमी म्हणजे कवितेसाठी जगणाऱ्यांचा गोतावळा आहे." अशा शब्दात काव्यप्रेमीचं वर्णन केले तर अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.मिलींद शेजवळ म्हणाले,"नवोदितांना उत्कृष्ट पथदर्शी प्लॅटफॉर्म निर्माण करणारी काव्यप्रेमी ही संस्था नसून एक परिवारच आहे." गुगल मीटद्वारे झालेल्या या ऑनलाईन काव्य महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन ठाण्याचे प्रमोद बाविस्कर, प्रास्ताविक महासचिव कालिदास चवडेकर, स्वागत राज्याध्यक्ष आनंद घोडके तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी केले.


      काव्य महोत्सवाच्या उद्घाटनानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या थेट बाराव्या वंशज डॉ.शितल मालुसरे यांच्या अध्यक्षतेखाली "शिवकाव्य सुमनांजली" या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या कवितांचे सादरीकरण झाले. सदर सत्राचे सूत्रसंचालन करताना आकोटच्या पी.नंदकिशोरांनी शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहासच उलगडून दाखवला. 
           डॉ शीतल मालूसरे यांच्या
"संस्काराचा धडा
आणि सह्याद्रीचा कडा
पाठीवर ची ढाल 
अज्यिंक तलवार
समर्थक खंदा
लाखोंचा पोशिंदा
रणमर्द मराठा
आणि आठवणींचा साठा
गनिमी काव्यात माहिर
आणि शब्दांचे शाहिर
 म्हणजे राजे शिवछत्रपती", 
 डाॅ के डी संखे यांच्या
"जिजाऊच्या उदरी जन्मला
देश,धर्म रक्षण करण्याला
प्रभूवर ,शिवनेरीला अवतरला
दैवता,त्रिवार वंदन तुला, दैवता..."
सौ पल्लवी विठ्ठल पाटील, कोल्हापूर यांच्या
"मानाचा हा सहस्त्र मुजरा शिवबा तुझ्या प्रतिमेला 
तुझ्या किर्तीचे पोवाडे गातो कोटी कोटी सलाम तुजला"
सौ.मुग्धा कुळये, रत्नागिरी यांच्या
"शूर, धाडसी कथा सांगुनी दिले मायने शिक्षण
शत्रूपासुन प्रजाजनांचे करण्यासाठी रक्षण
स्फूर्ती बनुनी दिली चेतना राज्य निर्मिण्यासाठी...." या कवितांबरोबरच या सत्रातील सर्व शिवकाव्यानी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

       
यानंतर सौ.आशा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "काव्यमौक्तिके", कृष्णा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली "काव्य रंग", सौ.जया नेरे यांच्या अध्यक्षतेखाली "काव्यतरंग", कालिदास चवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली "गझलायन(गझल मुशायरा)" तर दीपक सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली "काव्य गुंजन(हिंदी काव्यपाठ)" अशा ७ काव्यसत्रांचे आयोजन करण्यात आले होते. दोनशेहून अधिक कवींच्या सहभागाने यशस्वी झालेला "काव्यमहोत्सव" संपन्न करण्यासाठी काव्यप्रेमी राज्य समिती सदस्यांबरोबरच सौ.मनाली माळी(नवी मुंबई), संजय कुळये(रत्नागिरी), हणमंत पडवळ (उस्मानाबाद), सौ.निशा खापरे (नागपूर), विजया पाटील (नवापूर), रविंद्र सोनवणे (मुंबई), सुरेश तायडे (बुलढाणा), रझिया जमादार (अक्कलकोट), योजनगंधा जोशी (सोलापूर) व निलोफर फणीबंद (अक्कलकोट) यांचेही विशेष सहकार्य लाभले. काव्यप्रेमी शिक्षक मंच नागपूर जिल्हा अध्यक्षा सौ निशा खापरे यांनी यावेळी सांगितले.

 
Top