मंदिरावर अवलंबून असणाऱ्या पुजारी आणि व्यापारी यांची तुळजापूरात आर्थिक कोंडी, उपासमारीचे संकट

राष्ट्रीयीकृत, सहकारी व नागरी बँकांनी कर्ज देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज

तुळजापूर, दि. 21 : डॉ. सतीश महामुनी

श्री.  तुळजाभवानी मंदिर भाविकांना बंद असल्यामुळे मंदिरावर अवलंबून असणाऱ्या गोरगरीब पुजारी वर्गाचे आणि शहरातील यात्रेवर अवलंबून असणारे दुकानदाराचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी होऊन त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. 

श्री.  तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे ,त्याचबरोबर बाजारपेठ उघडण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी येथील समाजसेवक आणि व्यापारी संजय कुमार बोंदर यांनी दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. तुळजापूर हे संपूर्ण शहर यात्रेवर अवलंबून असल्यामुळे शहराच्या सर्व भागातील उद्योग, व्यवसाय बाहेरगावाहून येणाऱ्या यात्रेकरू यांच्यावर अवलंबून आहे. गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद असल्यामुळे या दोन प्रमुख घटकासह फुटपाथवर व्यवसाय करणारे छोटे व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असणारे रोजंदारी मजूर यांच्यावर अक्षरशः उपासमारीचे  पाळी आहे.

आपल्या कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा या चिंतेत ही मंडळी असून नगरसेवक आणि सेवाभावी संस्था यांनी यापूर्वी केलेली तुटपुंजी मदत संपून गेली आहे. 

मंदिर भाविकांना खुले झाल्यानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी व जनजीवन पूर्ववत होण्यासाठी मोठा काळ लागणार आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करीत मंदिर उघडले पाहिजे, अशी मागणी व्यापारी प्रतिनिधी संजय कुमार यांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून सातत्याने पुजारी आणि व्यापारी या वर्गावर आर्थिक संकट येत आहे.

 शारदीय नवरात्र महोत्सव तसेच चैत्री यात्रा या काळात होणारा व्यवसाय, व्यापार्‍यांची खूप जमेची बाजू होती परंतु अलीकडचे काही वर्ष बंदोबस्ताच्या नावावर मंदिरातील प्रवेशमार्ग मध्ये झालेल्या बदलामुळे खूप मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसलेला आहे. सातत्याने होणाऱ्या संकटामुळे व्यापारी कायम अस्थिर आणि कर्जबाजारी झालेला आहे. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे . या संकटामधून व्यापाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका सहकारी बँका आणि नागरी पतसंस्था यांनी आपला पैसा या व्यापारी वर्गाकडे कर्जरूपाने दिल्याशिवाय तुळजापूर येथील बाजारपेठ स्थिर होऊ शकणार नाही. हे वास्तविक आहेत, या संदर्भात आमदार, खासदार आणि बँक अधिकारी यांनी व्यापारासाठी सोयीचे कर्ज वितरण करण्याची भूमिका घेतली पाहिजे.
 
Top