तुळजापूर, दि.११: राजगुरु साखारे
 तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून अद्यापही वंचित, मशागतीसह खरिपाच्या तोंडावर खत, बियाणे, पेरणीसाठी बळीराजा कासावीस !  पेरणीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शेतकर्‍यांतून मागणी होत आहे .

 
जिल्ह्यात कधी दुष्काळ, कधी अवकाळी तडाखा, कधी अतिवृष्टी, कधी शेतमालाचे गडगडले दर, कधी कोरोना मुळे लाॅकडाउन  यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा अस्मानी व सुलतानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आर्थिक संकटावर मात करीत यंदा शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. उधार उसनवारी व टक्केवारीचा आधार घेत प्रसंगी सावकाराचे उंबरठे झिजवुन महागडी खते बियाण्यांसाठी कशीबशी आर्थिक  तजबीज करून खरीपाच्या पेरण्या केल्या होत्या. त्यानंतर निकृष्ट बियाणे, कमी-अधिक पर्जन्यामुळे अनेक शेतकऱ्याची बियाणे उगवले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी ला तोंड द्यावे लागले, शेतकऱ्यांनी आर्थिक भुर्दंड सहन करत दुबार पेरणी केली, त्यामुळे पीक जोमात वाढली होती, परंतु ऐन काढणीच्या वेळेस ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे शेतात तळे साचून सोयाबीन उडीद , कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीन पिवळे पडले, तर काही ठिकाणच्या सोयाबीनच्या गंजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे वाहून गेल्या. सोयाबीन व उदडाला अंकुर फुटले. त्यानंतर पिक विमा कंपनीकडून मात्र नुकसानीची ऑनलाईनमाहिती भरण्याचे जाचक अट लादण्यात आली होती. यामध्ये विशेषता पिकाची नुसकान झाल्यापासून 72 तासाच्या आत माहिती कंपनी ना कळवणे अनिवार्य करण्यात आले होते, या अटीवर बोट ठेवून कंपनीने पिकविमा नाकारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मार्च महिन्यामध्ये कृषी आयुक्तांनी विमा कंपनी ना, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहेत, त्या शेतकऱ्यांना क्षेत्र  घटकानुसार पिक विम्याच्या माध्यमातून नुसकान भरपाई द्यावी. असे निर्देश कृषी आयुक्तालयाने संबंधित पिक विमा कंपन्यांना पत्राद्वारे दिले आहेत. 

विशेषता जिल्हा व कृषी प्रशासनामार्फत 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. परंतु विमा कंपनीकडून मात्र शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान भरपाई निश्चित करण्याचे काम योग्य प्रकारे व वेळेत झाली नसल्याचे कृषी मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत निदर्शनात आले होते. एकंदरीत या कृषी आयुक्तालयाच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे, परंतु शेतकऱ्याचा हिसाब किताब करण्याचा, सालगडी ठरविण्याचा गुढीपाडवा हा सण होऊन गेला तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार की नाही या प्रतीक्षेत सध्या शेतकरी बांधव दिसत आहेत.       

 बेटा बिराजदार, शेतकरी चिवरी ता.तुळजापुर   
बजाज इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी लावलेली जाचक अट रद्द करून शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पीक विम्याचे वाटप करण्यात यावे             .                
 
   राजीव कचुवाई, शेतकरी, चिवरी ता.तुळजापुर                     
शेतकऱ्यांना सध्या लाॅकडाउन, अवकाळी, अतिवृष्टीचा तडाखा अशा एक ना अनेक संकटांना तोंड देत शेतकरी सध्या उभा आहे त्यात विमा कंपनीने लावलेल्या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्यापासून वंचित राहावे लागत आहे,  त्यामुळे कंपनीने लावलेली जाचक अट रद्द करून      शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा.‌‌

  
 
Top