उस्मानाबाद, दि. 21:

मराठवाडा हा कायम दुष्काळी  भाग म्हणून ओळखला जातो.त्यातही उस्मानाबाद जिल्हयात यापूर्वीच्या काही वर्षापूर्वीचा अभ्यास केला असता दर वर्षी 100 ते 150 टॅक्टरने पाणी पुरवठा करावा लागत  असे. जिल्हयातील पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हयातील जून्या बंधाऱ्यांच्या दुरूस्तीचे काम एकाच वेळी (वन स्ट्रोक) हाती घेण्यात येईल.यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन समितीकडून जास्तीत जास्त देण्यात येईलच, त्याशिवाय राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून हे काम केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवार दि.२१ रोजी येथे केले.


उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले, तेंव्हा श्री गडाख हे बोलत होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे होते. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, आमदार  विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.डी. कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत दे. कुंटला,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी  प्रीतम श्री. कुंटला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल सगर आदी उपस्थित होते.


उस्मानाबाद जिल्हयातील भव्य अशा नियोजन भवनाच्या इमारतीचे उदघाटन करताना मला खूप आनंद होतोय. मराठवाड्यातील दुर्लक्षित अशा जिल्हयात अतिशय देखणी इमारत उभी राहिली आहे.ज्यांनी –ज्यांनी या इमारतीच्या उभारणीत योगदान दिले आहे, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.जिल्हयातील शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या वैभवात भर घालणारी ही इमारत आहे.तेव्हा जिल्हयाच्या विकासाचे काम येथून व्हावे.येथून  जिल्हयाच्या विकासाचे चोख नियेाजन व्हावे. लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणे या इमारतीची स्वच्छता आणि देखभाल राखली जावी,परंतु मी पालकमंत्री असे पर्यंत या इमारतीच्या दुरूस्तीसाठी मी एक पैसाही देणार नाही, यांची दक्षताही प्रशासनाने घ्यावी, असे मत पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्हा नियेाजन समिती हा जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा आत्मा आहे.जिल्हा वार्षिक योजना 2020-21 करिता 260 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता,त्यापैकी 259 कोटी 40 लाख रुपये  इतका निधी खर्च करण्यात आला. या खर्चाची टक्केवारी 99.46 इतकी आहे.गेल्या वर्षी तालुकानिहाय समप्रमाणात कामांचे वाटप करण्यास प्राधान्य देण्यात आले, तर नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले,असे सांगून पालकमंत्री श्री.गडाख म्हणाले ,जिल्हयातील कोल्हापुरी बंधाऱ्यांना प्राथमिक तत्वावर तीन ठिकाणी अर्ध स्वयंचलित यांत्रिकी गेट बसविण्यास मान्यता दिली आहे.आपल्या आकांक्षित जिल्हयात येणाऱ्या काळात विकासाची कामे  करताना सर्वांची साथ हवी आहे.जिल्हयातील सध्याच्या प्राप्त निधीतून 67 कोल्हापुरी  बंधारे  आणि 109 लघु पाटबंधाऱ्यांच्या दुरूस्तीच्या कामांना मंजुरी दिली आहे.कोरोनाच्या काळात या कामांना गती देता आली नाही,परंतु जिल्हयातील पिण्याच्या  आणि सिंचनाच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी जुन्या सर्व बंधाऱ्यांची एकाच वेळी जिल्हा नियोजन मधून आणि राज्य सरकारकडून निधी मिळवून दुरूस्ती करण्यात येईल.


या कामासाठी शंभर ते 125 कोटी रुपयांची गरज आहे.एवढा निधी प्राप्त केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 कोरोनाच्या कालखंडात 2020-21 मध्ये 26 कोटी 97 लाख रुपये जिल्हा निेयोजनच्या निधीतून खर्च करून विविध औषधी,यंत्रसामग्री, रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किंट,मेडिकल गॅस पाईपलाइन सिस्टीम, जंबो सिलेंडर, कोरोना टेस्टींग लॅबोरेटरी यंत्रसामग्री आदीवर हा खर्च करण्यात आला आहे.याच निधीतून लिक्वीड ऑक्सिजन टँक निर्मितीचे काम करण्यात आल्याने ऑक्सिजनची गरज दुसऱ्या लाटेच्यावेळी भागविण्यास मदत झाली,असे सांगून जिल्हा वार्षिक योजना 2021-22 अंतर्गतही विविध सुविधासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यातून उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करण्याची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.जिल्हयाच्या विकासाचे आव्हान आपण सर्वांनी मिळून पेलू या, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहनही पालकमंत्री श्री.गडाख यांनी यावेळी केले.

जिल्हा नियोजन समिती जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे नियेाजन करण्याबरोबरच आमदार खासदार यांच्या निधीच्या कामासाठीचे वाटपही करते. त्यामुळे या समितीचे काम खूप महत्वाचे आहे. या कार्यालयास प्रत्येक जिल्हयात नियेाजन भवन असावे,असा विचार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबाद येथील आढावा बैठकीत व्यक्त केला होता.त्यातून आता प्रत्येक जिल्हयात नियोजन भवनाच्या इमारती  उभ्या राहत आहेत.
उस्मानाबादची इमारतही खूप भव्य आणि देखणी झाली आहे.पण यापुढे या इमारतीची स्वच्छता राखली जावी. ही इमारत कायम चकचकीत व स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी, असे मत आमदार श्री.काळे यांनी व्यक्त करून ही इमारत बांधण्यास सहा वर्षांचा कालावधी लागला, तो कमी केला असता तर खर्चही कमी झाला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हयात जिल्हा नियेाजन समितीच्या बैठका घेण्यास अडचण होत होती,त्यामुळे जिल्हाधिकारी गेडाम यांच्या काळात या इमारतीसाठी प्रयत्न झाले.त्यानंतर 2014 मध्ये या इमारतीच्या बांधकामांस मान्यता मिळाली. अलिकडे चीनमध्ये 28 तासांत  24  मजली इमारत बांधल्याचे आमदार काळे यांनी सांगितले, पण चीन मधील इमारती अल्प कालावधीत पडतातही.चीनी वस्तू सारखी त्यांच्या इमारतीची आवस्था असते.आपल्या इमारतींचे आयुष्य किमान शंभर वर्षापर्यंतचे असते. परंतु या इमारतींची चांगली देखभाल राहावी, अशी अपेक्षा आमदार श्री. चौगुले यांनी व्यक्त केली.
संबंध मराठवाडा आणि सिमावर्ती जिल्हयात नाही अशी अतिशय देखणी इमारत  उस्मानाबादमध्ये नियोजन भवनाच्या रुपाने उभी राहिली आहे, असे मत व्यक्त करून खासदार श्री. राजेनिंबाळकर म्हणाले,मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांनी लक्ष घालून ही इमारत पूर्ण केली आहे.त्यामुळे या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे अधिक लक्ष भविष्यात देण्याची गरज आहे.जिल्हयातील कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या गेटच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पाणी वापर  संस्थाकडे  दिल्यास त्यांचे संगोपन होऊन ते दीर्घकाळ उपयोगात राहतील.आकांक्षित जिल्हा म्हणून असलेल्या उस्मानाबादची ओळख मिटविण्यासाठी सर्वांनी मिळवून काम करावे.वैद्यकीय महाविद्यालयासाठीच्या जागेबाबत करार होऊन या महाविद्यालयाचा प्रस्ताव एमसीआरकडे पाठविण्याच्या  कामांची कार्यवाही होण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


जिल्हयाचे मागासलेपण आपल्या मानसिकतेत आहे. ते काढून टाकण्याची गरज व्यक्त करून जि.प.अध्यक्षा श्रीमती कांबळे म्हणाल्या की,मतभेद विसरून जिल्हयाच्या विकासाचा विचार केला तर जिल्हयाचे मागसलेपण कमी करता येईल.जिल्हयातील ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या इमारतींच्या बांधककामासाठी निधी दिला जावा,जि.प. यशवंतराव चव्हाण सभागृहाची दुरूस्ती करण्यासाठी दोन कोटी रूपये जिल्हा नियोजन मधून देण्यात यावेत,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
उस्मानाबाद जिल्हयास दोन हजार वर्षाचा इतिहास आहे.तेर मधील जुन्या वास्तू त्याची साक्ष आहे. 1905 पर्यंत जिल्हयाचे नाव नळदुर्ग असे होते. काही काळ जिल्हा ब्रिटीशांच्याही ताब्यात होता.जिल्हयाचा समृध्द असा वारसा आहे.हा वारसा जोपासण्याचे काम या इमारतीत करण्यात येणार आहे.सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीवर गेल्या 40-50 वर्षातील ऐतिहासिक छायाचित्र लावण्याचे काम करून वारसा जोपसाला आहे. या इमारतीतही निजाम कालीन ग्रंथ,वारसा जोपसाला जाईल,असे सांगून जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी कोरोना काळात पालकमंत्री,लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याची आठवण करून त्यांचे आभार मानले.

लोकप्रतिनिधीच्या सहकार्यामुळे ऑक्सिजन प्लांट उभे करता आले आणि इतर सुविधा निर्माण करून आपण जिल्हयाचा कोरोना मृत्यू दर आठ वरून दोन वर आणण्यात यश मिळविल्याचेही त्यांनी यावेळी आभारांच्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस नियोजन भवन इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ दीप प्रज्ज्वलन  करून आणि कोणशिलेचे अनावरण करून  पालकमंत्री श्री.गडाख यांनी या इमारतीचे उदघाटन केले.त्यानंतर फिरून संबंध इमारतीची पाहणीही त्यांनी केली.यावेळी इमारतीचे ठेकेदार लोकमंगल कंन्स्ट्रक्शन कंपनी, सोलापूर, वास्तु विशारद ,विद्यूत विषयक काम केलेल्या सुवर्ण इंटरप्रायजेस आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री.कुलकर्णी आणि श्री.सगर यांचाही सत्कार पालकमंत्र्यानी केला.जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने काढलेल्या खरीप हंगामातील पिकांमध्ये सर्वाधिक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या लागवड पध्दतीवरील पुस्तकाचे प्रकाशनही पालकमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  नियेाजन अधिकारी श्रीकांत कुंटला यांनी केले.या कार्यक्रमास जिल्हा नियेाजन समितीचे सदस्य आणि जिल्हा मुख्यालयातील विविध कार्यालयाचे प्रमुख उपस्थित होते.
 
Top