काटी,दि.१० :
नेहमी प्रमाणेच मंगरूळ बीट मधील शिक्षकांनी समाजाप्रती आपली संवेदनशीलता जपत मंगरूळ परिवाराचे प्रमुख शिक्षण विस्तारअधिकारी मल्हारी माने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत
दिवंगत चंद्रकांत कांबळे यांच्या कुटुंबियांसाठी 3 लाख 54 हजार 101 रुपयेचा निधी सुपूर्द केला.
मंगरूळ बीट मधील संवेदनशील शिक्षक चंद्रकांत कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कांबळे यांचे शाळेसाठी आणि संपूर्ण मंगरूळ बीटसाठी फार मोठे योगदान होते. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात कोणीही कमावती व्यक्ती नाही. दवाखान्यासाठी त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा खर्च झालेला होता. मंगरूळ बीटने त्यांच्या परिवारासाठी मदत निधी जमा करण्याचे ठरवले. आणि थोड्याच कालावधीत परिवारातील शिक्षकांनी मदत निधी जमा केला. त्याचबरोबर कांबळे यांची चिवरी ता.तुळजापूर येथिल शाळा दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालय व त्यांच्या मित्रपरिवारानेही या आवाहनाला प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणावर निधी जमा केला. एकूण 3 लाख 54 हजार 101 रुपये मदत निधी जमा झाला.
गुरुवार दि.10 जुन रोजी तो संपूर्ण निधी दिवंगत चंद्रकांत कांबळे यांच्या पत्नी श्रीमती निर्मला चंद्रकांत कांबळे यांच्याकडे मंगरूळ परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
शैक्षणिक कामामध्ये व विविध उपक्रमांमध्ये मंगरूळ परिवार नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. तसेच सामाजिक कार्यातही परिवार संवेदनशीलपणे सतत आघाडीवर असतो. अकाली निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मदत असो की लॉकडाऊन कालावधीत निराधार कुटुंबीयांना किराणामालाचे किट्स वाटप करणे ,मंगरूळ परिवारातील शभंर टक्के शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेऊन भरभरून मदत केलेली आहे. परिवारातील शिक्षकांच्या या सामाजिक बांधिलकी बद्दल परिवाराचे प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी एम. ई. माने यानी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानले आहे.