तुळजापूर, दि. १० : डॉ. सतीश महामुनी
जिल्हा प्रशासनाकडून जनजीवन सुरळीत होण्यासाठी देण्यात आलेल्या सवलतीनंतर तुळजापूर शहरात नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ. आशिष लोकरे यांनी  सर्व बाजारपेठांमध्ये लोकांना मास्क वापरण्याबाबत निर्देश दिले. 
भविष्यामध्ये तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना मास्क वापरण्यासाठी  सतर्क केले जात आहे.

नगरपरिषदेचे पाहणी पथक  आर्य चौकात आल्यानंतर अनेक नागरिक विनामास्क  असल्याचे दिसून आल्याने मुख्याधिकारी  लोकरे यांनी त्याना मास्क वापरण्या संदर्भात  महत्त्वाच्या सूचना केल्या. याप्रसंगी त्यांनी नागरिकांना काही प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे जाणून घेतली. या चर्चेनंतर सदर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना अमलात आणल्या.   अधिकारी महादेव सोनार व इतर कर्मचारी यावेळी पथकात होते. 

शहरातील मंगळवार पेठ, आंबेडकर चौक , भवानी रोड, दीपक चौक ,जवाहर गल्ली,  तुळजाभवानी मंदिर परिसर, आर्य चौक' कमान वेस यासह शहरातील विविध भागात नगरपरिषदेच्या या पथकाने  मास्क वापराची पाहणी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना करून कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी मास्क काढू नये, अशा सूचना केल्या, शहरांमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना देखील या पथकांनी सूचना केल्या. यामधील विशेष बाब अशी आहे की बाहेर जाऊन येणाऱ्या बहुतांश भाविक आणि नवदांपत्यांना मास्क उपयोगात आणल्याचे चित्र आहे. भविष्यामध्ये तिसरी लाट येऊ नये यासाठी नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासन यांच्या निर्देशाप्रमाणे तुळजापूर शहर आणि तालुक्यात नागरिकांनी मास्क वापरण्या संदर्भात प्रशासन सतर्क आहे.
 
Top