तुळजापूर, दि. १० :
छोट्या छोट्या बचत गटामधून करण्यात येणाऱ्या व्यवहारामुळे गोरगरीब लोकांच्या महत्त्वाच्या अडचणी दूर होतात. त्यामुळे बचत गटांची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे, त्यासाठी आवश्यक असणारे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माजी नगरसेवक विनोद गंगणे यांनी दिले.
श्री शिवाई पुरुष व महिला दिव्यांग बचत गटाच्या ९ जून रोजी प्रथम वर्धापन दिनानिमित्त बचत गटाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवा नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कने हे उपस्थित होते .
कार्यक्रमास बचत गट अध्यक्ष नागेश कुलकर्णी, उपाध्यक्ष हिना खान, सचिव शशिकांत मुळे, तसेच बचत गटातील सदस्य गजेंद्र व्यवहारे , कमलाकर डिग्गे, प्रकाश देशपांडे, ज्ञानेश्वर मडके, संतराम जाधव, संतोष पवार, शारदा जाधव, अलका इटकर, सुलोचना सुरवसे, ज्योती सोनवणे, लक्ष्मी लकशेट्टी आदी सदस्य उपस्थित होते .
विनोद गंगणे यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, महिला बचत गट अधिक यशस्वी होतात . कारण महिलांमध्ये असणारी काटकसर आणि वेळेमध्ये परतफेड करण्याची वृत्ती, त्यामुळे सर्वच बचत गटांनी गरजू लोकांना कर्जरूपाने मदत करावी व कर्जदारांनी देखील बचत गटाच्या निर्देशाप्रमाणे निर्धारित काळामध्ये कर्ज फेडावे, हे व्यवहार चांगल्या पद्धतीने झाल्यास गोर गरीबाना इतर ठिकाणी आर्थिक अडचण सोडवण्यासाठी जाण्याची आवश्यकता पडणार नाही. यावेळी मान्यवरांचे स्वागत शशिकांत मुळे यांनी तर आभार अध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी मानले.