चिवरी ,दि.३: राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील शेत शिवारात सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून ट्रॅक्टर, रोटोव्हटर द्वारे शेत जमीन तयार करण्यात येत आहे. हवामान खात्याने यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचे संकेत दिल्याने शेत शिवार गजबजले आहे.
शेतात नांगरणी, कुळवणी, मोगडा मारणे, काडी कचरा वेचणे , ठिबक सिंचनाच्या नळ्या पसरवणे, शेणखत शेतात टाकणे आधी कामे सुरु आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने भूजल पातळी उंचावली आहे. धरणे, विहिरीमध्ये पाण्याची स्थिती अजूनही चांगली आहे. मागील आठवड्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे गाई गुरांसाठी कडबा,कुट्टि, चारा वर्षभर करीता साठवुन ठेवण्यासाठी शेतकरी बांधव प्रयत्न करीत आहेत. यावर्षी रब्बी हंगामात गहु, ज्वारी, हरभरा,मका, आदी पिकांचे चांगले उत्पादन झाले, मात्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॉकडाउनमुळे शेतकरी बांधवाची नुस्कान झाली आहे. आता पुन्हा नव्या उमेदीने शेतकरी बांधवांचा मोर्चा शेत-शिवार कडे वळला आहे .
यंदा रोहिणी नक्षत्रात चांगला पाऊस बरसल्यामुळे व मृग नक्षत्राच्या कार्यकाळात खरिपाची पेरणी होईल, या आशेने शेतकरी मान्सूनपूर्व कामे करीत आहेत. अंगाची काहिली होत असताना शेतातील कामे शेतकरी बांधव करत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पावसाला लवकर सुरुवात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कामाला अधिक सुरुवात केली आहे.
रोहिण्या नक्षञाचा पाऊस बरसल्यामुळे यंदा इरडपाळी घालून तणाचा नायनाट करता येईल व मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी करता येईल, या आशेने बळीराजा पेरणीपूर्व कामात व्यस्त आहे.