उमरगा,दि.१६ :
उमरगा नगर परिषदेचा 'क' वर्ग दर्जावाढ करून वर्ग 'ब' मध्ये समावेश करण्याची मागणी उमरगा - लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे केली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे कि, उमरगा शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर असून नगर परिषदेस सध्या 'क' वर्ग दर्जा प्राप्त आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराच्या हद्दीतील व हद्दवाढ भागातील लोकसंख्या एकूण ६० हजार इतकी आहे. 'क' वर्ग दर्जा प्राप्त नगरपरिषद व वाढलेली लोकसंख्या याचा विचार करता नगर परिषदेस शासनाकडून येणारे अनुदान आकृतिबंधानुसार उपलब्ध अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून शहरवासियांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
उमरगा नगर परिषदेकडून 'क' वर्ग दर्जावाढ करून वर्ग 'ब' मध्ये रूपांतर करण्यासाठी साठी २०१३ मध्ये जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्या मार्फत औरंगाबाद विभागीय आयुक्त, यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
सदर दर्जावाढ झाल्यास शासनाकडून येणाऱ्या अनुदानात वाढ होऊन यातून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे सोयीचे होईल. तसेच आकृतिबंधानुसार अधीकारी व कर्मचारी यांच्या संख्येत वाढ होऊन याचा फायदा शहरवासियांना विविध सोयी सुविधा पुरविण्यासाठी होईल. तसेच अनेक तांत्रिक प्रक्रिया सुलभ होऊन नगर पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.
या सर्व बाबींचा विचार करून उमरगा नगरपरिषदेस वर्ग 'क' मधून वर्ग 'ब' मध्ये दर्जावाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली.