सलगरा, दि.२४ :
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळा प्रशिक्षक स्नेहल उमा विरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. बहुसंख्य लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे म्हणून त्या अनुषंगाने शेतकऱ्यांपर्यंत पारंपरिक व आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तसेच त्यांचे शेतीविषयक प्रश्न सोडवणे व त्यांना मार्गदर्शन करणे, या करिता शासनाने शेती शाळा हा उपक्रम सुरु केला आहे.
यामध्ये शेती दुत यांनी शेतीविषयक योग्य सल्ला देऊन त्यांचे उत्पन्न कसे वाढवले जाईल, याबद्दल सखोल माहिती दिली, शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया करणे, व बीबीएफ तंत्रज्ञाना बाबत देखील मार्गदर्शन केले.
शेतीशाळा प्रशिक्षक स्नेहल पाटील यांनी महाराष्ट्र शासना अंतर्गत चालू असलेल्या कृषी विभागाच्या बीज प्रक्रियेच्या स्पर्धेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी केले.
शेती-शाळा हा कार्यक्रम का व कशासाठी असतो या बद्दल सर्व माहिती स्नेहल पाटील व उमेश माळी बनकर यांनी समजावून सांगितले. तसेच आधुनिक व पारंपरिक शेती बद्दलचे आपले मत मांडून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविले, तसेच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय खतांचा जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबद्दल आपले मत मांडले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, समुह सहाय्यक उमेश माळी बनकर व गावातील सर्व शेतकरी वर्ग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी उपसरपंच प्रशांत लोमटे यांचे विशेष सहकार्य लाभले.