तुळजापूर,दि.१०
श्री. क्षेत्र तुळजापूर येथिल श्री. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात
विनापरवाना छायाचिञ काढणे, आणि चित्रीकरण करण्यास भाविक भक्ताना मनाई करण्यात आली असतानाही मोठया प्रमाणावर फोटो तसेच चित्रीकरण माध्यमावर व्हायरल होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने
यांचा जाब मंदिराच्या सुरक्षा कंपनीस पत्र पाठवुन विचारणा केली आहे.
याबाबतचे निर्देश बुधवार दि.९ जुन रोजी तुळजाभवानी मंदिर सुरक्षा कंपनी बी.व्ही.जी.ला दिले आहेत. दरम्यान, मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना बंदी असताना ही तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यातील फोटो, चित्रीकरण व्हायरल होतातच कसे, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विना परवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास बंदी आहे. मात्र असे असतानाही सदर आदेशाचे उल्लंघन करत दररोज तुळजाभवानी मातेचा गाभाऱ्यातील तसेच मंदिरातील शेकडो फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील फोटो तसेच चित्रीकरणाचा दुरूपयोग होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने मंदिरातील सुरक्षा कंपनी बीव्हीजीला पत्र दिले असून, या पत्राद्वारे तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात विना परवाना फोटो काढणे तसेच चित्रीकरण करण्यास मनाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तशा आशयाची नोटीस तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात डकवण्यात आली आहे. यानंतर तरी मंदिरातील फोटो आणि चित्रीकरण थांबेल अशी अपेक्षा सामान्य भाविक भक्तातून व्यक्त करण्यात येत आहे. तुळजाभवानी मातेचे फोटो मंदिर संस्थानच्या संकेत स्थळावरून घ्यावेत. मंदिरात फोटो काढायचे असतील किंवा चित्रीकरण करायचे असेल तर मंदिर संस्थानची रितसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.
मंदिर परिसरात सामान्य भाविक फोटो काढत असेल तर लगेच सुरक्षारक्षक भाविकांना रोखतात, मोबाइल हिसकावून घेत फोटो डिलीट करतात. मात्र त्याचवेळी गाभाऱ्यात फोटो काढताना तसेच चित्रीकरण करण्यात येत असताना मंदिरातील सुरक्षारक्षक डोळेझाक का करतात, मंदिरात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही मंदिर संस्थान कारवाई करण्यात टाळाटाळ का करते, हे न उलगडणारे कोडे आहे.
मंदिरात फोटो आणि चित्रीकरण करण्यास सामान्यांना बंदी असताना ही गाभाऱ्यातले फोटो तसेच चित्रीकरण सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेषतः लाॅकडाऊनमध्ये मंदिर बंद असतानाही मंदिरातील चित्रीकरण व्हायरल होत असल्याने सर्वञ जोरदार चर्चा होत आहे.