तुळजापूर, दि. २१ :
उस्मानाबाद जिल्ह्यातील फणेपूर येथे राज्य मागासवर्ग आयोगाचे नवनिर्वाचित सदस्य, मराठवाडा शिक्षक सेनेचे अध्यक्ष डॉ. गोविंद काळे यांचा नागरी सत्कार माजी खासदार रवींद्र गायकवाड व उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते रविवार दि. २२ जून रोजी संपन्न होत आहे.
मराठवाडा शिक्षक सेनेचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वरिष्ठ सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे यांचे राज्य सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोग सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील फनेपुर त्यांच्या जन्मगावी दि. २२ जून रविवार रोजी माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नागरी सत्काराचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी ग्रामपंचायतीने घेतली आहे, राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करीत या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उमरगा शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव शहापुरे ,शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड , शिवसेना तालुकाध्यक्ष लोहारा मोहन पेनुरे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रमोद पवार , सरपंच सायराबी मुल्ला, उपसरपंच नागनाथ लिंगशेट्टी यांच्यासह इतर प्रतिष्ठित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे वरिष्ठ महाविद्यालय इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे प्रोफेसर डॉ. गोविंद काळे यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथमच राज्य मागासवर्ग आयोग या राज्यस्तरीय समितीमध्ये सदस्य म्हणून सन्मान प्राप्त झाला आहे. हा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्याला अभिमानाचा आणि गौरवाचा विषय असल्यामुळे सर्व नागरिकांच्या वतीने या नागरी सत्काराचे आयोजन राज्य सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करीत करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष सातत्याने कार्यरत राहून वेगवेगळ्या पदावर विद्यापीठ आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम डॉ. गोविंद काळे यांनी निष्ठेने केले. शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून शिक्षक क्षेत्रातील मूलभूत प्रश्नांना न्याय देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेऊन सातत्याने कार्य केले. याची योग्य ती दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीमध्ये डॉ गोविंद काळे यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. या गौरवास्पद नियुक्तीनंतर ग्रामस्थ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत माजी खासदार रवींद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी 11 वाजता फनेपुर येथे सत्काराचा कार्यक्रम होणार आहे