"
अणदूर ,दि.१९ :
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन संचलित समृद्धी एकल महिला बचत गटाच्या माध्यमातून मास्क निर्मिती केंद्र चालविण्यात येत असून या केंद्रांतर्गत कार्यक्षेत्रातील एकल महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.
कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक प्रकारचे सुरक्षित मास्क तयार केले जात आहेत. या मास्कपासून मिळणारी सुरक्षा पाहता अणदूर व परिसरासह सोलापूर, पुणे , मुंबई, औरंगाबाद लातूर यासारख्या मोठ्या शहारातूनही या अत्याधुनिक पद्धतीने तयार केलेल्या मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. हॅलो संस्थेच्या कार्यक्षेत्रातील दुर्लक्षित असलेल्या एकल महिलानी स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगावं यासाठी त्यांना या मास्क निर्मिती संदर्भातील प्रशिक्षण देऊन व वेळोवेळी मार्गदर्शन करून मास्क निर्मिती केंद्रामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करण्याची संधी दिली जात आहे. आणि या माध्यमातून या एकल महिलांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत केली जात आहेत.
सद्यपरिस्थिती पाहता लातूर व लोहारा येथेही अशा प्रकारचे मास्क निर्मिती केंद्र लवकरच उभारली जाणार असून याची संपूर्ण प्रक्रियाहि जवळपास पूर्ण झाली असल्याचे हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत अहंकारी यांनी स्पष्ट केले. यापुढेही हॅलो संस्था एकल महिलांसाठी काम करत राहणार असून या माध्यमातून फक्त मास्क निर्मितीच नव्हे तर या उद्योगाशी निगडित महिलांचे आरोग्य, स्वच्छतेसंदर्भातही व्यवसाय उभारले जाणार असल्याचे डॉ.अहंकारी यांनी सांगितले.
आजपर्यंत एकल महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला असून त्यांना वेळच्या वेळी मोबदलाही दिला गेला आहे. यामुळे अशा महिलांचा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीचा आत्मविश्वासही बळावल्याचे महिला सांगतात. या केंद्रामधून दररोज १० महिला काम करत आहेत. यामध्ये एकल , विधवा व परितक्त्या महिलांचा सहभाग आहे. आजपर्यंत या महिलांनी पंधरा हजार पेक्षा जास्त मास्क तयार केले आहेत. दिवसेंदिवस या कामाचा वेग वाढत असून सर्व नियमांचं पालन करत दररोज ८०० ते १००० मास्क तयार होत आहेत. त्याप्रमाणे या महिलांना या कामाचा मोबदला म्हणून प्रतिमाहिना प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये मिळत आहेत.
याबद्दल लाभार्थी एकल महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता, त्या सांगतात की, कुटुंबाचा दर महिन्याचा खर्च पाहिला तर उत्पन्नापेक्षा खर्चाची रक्कम जास्त आहे. त्यामुळं इतर नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत घ्यावी लागत होती. त्यांच्या पैशांची परतफेड कशी करावी, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर असायचा. परंतु जेव्हापासून आम्ही हॅलो संस्थेच्या मास्क निर्मिती केंद्रामध्ये काम करू लागलो तेंव्हापासून आम्ही जेवढं जास्त काम करू त्याप्रमाणे आम्हाला मोबदलाही मिळू लागला. आमची काम करण्याची इच्छाशक्ती वाढली. आता आम्ही कोणाकडूनही मदत न घेता कुटुंबाचा खर्च भागवू शकतो. यापुढेही जास्तीत जास्त काम करून आमच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया या महिला देतात.
दिवसेंदिवस या मास्कची मागणीही वाढत आहे. हॅलो संस्थेच्या वतीने नुकतेच तुळजापूर व लोहारा तालुक्यातील संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आशा कार्यकर्त्याना त्यांच्या सुरक्षिततेसाठी थर्मल गन, फेसशीलड, पल्स ऑक्सिमिटर सॅनिटायझर नोंदणी रजिस्टर, मास्क असे सुरक्षा किट मोफत देण्यात आले आहेत . त्याचबरोबर अणदूर येथील पत्रकारबंधू , संस्थे अंतर्गत कार्यरत असलेले अनिमेटर, प्रेरक, प्रेरीका संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या केंद्राचे उदघाटन केले असून या मास्क निर्मिती केंद्राच्या उभारणीसाठी सिपला फाउंडेशन, स्विस एड इंडिया पुणे, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा उद्योग केंद्र, आयआयसिटी नवी दिल्ली यांचा विशेष पुढाकार असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी या केंद्राची पाहणीही केली आहे.