तुळजापूर, दि.  ८ :डॉ. सतीश महामुनी

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अनलॉक झाल्यानंतर तीर्थ क्षेत्र असणा-या तुळजापूर येथे दिवसभर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मधून प्रवासाच्या वाहतुकीला सुरुवात करण्यात आली. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला अशी माहिती तुळजापूर आगाराचे प्रमुख राजकुमार दिवटे यांनी दिली.

सकाळी सात वाजल्यापासून दिवसभर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जिल्हा अंतर्गत आणि लातूर, सोलापूर येथे सोडण्यात आल्या. राज्य सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करीत चालक-वाहक आणि बस गाडी यांची योग्य ती खबरदारी घेऊन डिस्टंस राखून प्रवाशांना बसण्याची सोय करण्यात आली होती. याशिवाय दिवसभर संपूर्ण प्रवाशांनी मास्क वापरून बस मध्ये प्रवेश केला.

तुळजापूर येथील नवीन बसस्थानकामध्ये दुकाने दिर्घकाळानंतर उघडण्यात आले. सकाळी सात वाजता येथील दुकानदार आणि उपगृहाचे मालक आपल्या दुकानाची स्वच्छता करताना दिसुन आले.  येथील जुन्या बसस्थानकामध्ये आगारप्रमुख राजकुमार दिवटे सकाळी आठ वाजता उपस्थित होते. त्यांनी सर्व व्यवस्था आणि प्रवासी संख्या यांचा आढावा घेऊन संबंधिताना  योग्य त्या सूचना केल्या व बस सेवा सुरू केली.

आगार प्रमुख राजकुमार दिवटे यांनी सांगितले की, आज पहिला दिवस असल्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये प्रवासी संख्या असू शकेल. परंतु बससेवा सुरू झाल्याचे जनतेला समजल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळणार आहे. शासनाने दिलेले निर्देश सर्व प्रवाशांना पाळावे लागतील. मास्क सर्व प्रवाशांना बंधनकारक असून त्याशिवाय प्रवाशांना बस मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे बस मध्ये प्रवास करताना मास्क बंधनकारक राहील असे त्यांनी सांगितले.
 
Top