चिवरी, दि.८:
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले आहे, कोरोनामुळे कुणी आई गमावली तर कुणी वडील. अशी परिस्थिती असताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत असल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत,
यामध्ये प्रपंचाचा डोलारा ज्याच्या कर्तुत्वावर उभा आहे. असं घरातील 'कर्ते' व्यक्तिमत्व कोरोनाने हिरावून घेतल्याने अनेक घरे उघडी पडली आहेत,
अशीच घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील गुणवंत केशव कोरे हा तरुण गावाकडे पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुण्यात खासगी नोकरी करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता, 31 वर्षे वयाच्या गुणवंतने आपल्या कष्टाने प्रपंच उभा केला होता. 2014 साली त्यांचा विवाह झाला , पुढे कन्यारत्नाचा रूपाने लक्ष्मी घरी आल्या त्यांना स्वराली ५ वर्षाची आणि सायली 2 वर्षाची मुली झाल्या. अचानक या सुखी संसारास कोरोनाची दृष्ट लागली आणि काळाने त्या तरुणावर दि.४ रोजी अकाली घाला घातल्याने दोन चिमुकल्या मुलीचे ं पितृछत्र हरपले आहे.
आजही बाबाच्या येण्याकडे दोन चिमुकल्या डोळे लावून बसल्या आहेत, पण हे समजणे एवढ्यात त्या मोठ्या नाहीत. यापुढे त्यांना त्यांच्या आईला ''तुम्ही हो माता तुम्ही हो पिता'' ही भूमिका निभावावी लागणार आहे. गुणवंतने प्रपंचाचा डोलारा मोठ्या हिमतीवर कष्टाने उभा केलेला असताना नियतीने अखेर डाव साधला अन कोरोनाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला , कुटुंबाला मुख्य आधार असलेला खांबच निखळल्याने आता भविष्याचा वेध घेणाऱ्या या मुलींच्या पंखात शासनाकडून प्रयत्न मिळावेत अशी मागणी होत आहे. या घटनेने संपूर्ण चिवरी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.