तुळजापूर, दि. १२: डॉ. सतीश महामुनी

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आवश्यक माहिती न्यायालयासमोर न दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाल्याचा आरोप करुन  या अन्याय विरोधात भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्य सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष विजय शिंगाडे यांनी तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत दिला आहे.


तुळजापूर  भाजपा कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर  ओबीसी मोर्चा बैठक संपन्न झाली. 

ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे , यासाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत व पुन्हा स्थापित करण्यासाठी पदाधिका-यांना ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष  विजय शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले.

केवळ सहा जिल्ह्यातील ओबीसी अतिरिक्त जागेबाबत राज्य सरकारला न्यायालयाकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे याचा फटका संपूर्ण महाराष्ट्राला बसला आहे. राज्य सरकारने केलेले या चुकीमुळे त्याचे फळ संपूर्ण ओबीसी समाजाला भोगावे लागणार असल्याचे सांगुन  आगामी काळात महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी आघाडीच्या वतीने ज्या सूचना मिळतील, त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि पूर्वीप्रमाणे ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल. असा इशारा तुळजापूर येथे झालेल्या ओबीसी बैठकीत देण्यात आला.

 यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष  संतोष  बोबडे, तालुका खरेदी विक्री संघ माजी अध्यक्ष शिवाजी बोदले, जिल्हा चिटणीस गलचंद व्यवहरे, काटी सरपंच आदेश कोळी,ओबीसी जिल्हा चिटणीस तुकाराम माळी,ओबीसी तालुकाध्यक्ष फिरोज मुजावर,काका बंडगर,राम चोपदार,दिनेश बागल, बाळासाहेब भोसले,सचिन घोडके,रवी बंडगर,नवनाथ मारकड, बाळासाहेब खांडेकर,देविदास राठोड, रमेश पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top