तुळजापूर दि १२ डॉ. सतीश महामुनी

उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुचर्चेत असणारी तुळजापूर नगरपरिषद आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने संभाव्य उमेदवाराकडून आपापल्या प्रभागांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली  आहे, शहरातील विशिष्ट प्रभागांमध्ये होणाऱ्या खर्चामुळे इतर २०  प्रभागांमधील उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.


तीर्थ क्षेत्र असणाऱ्या तुळजापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक पार पाडण्यासाठी तयारी सुरू असल्याचे वृत्त मिळाल्यानंतर तुळजापुरात संभाव्य उमेदवारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे, नगरपरिषद निवडणूक आणि प्रभागात उमेदवाराकडून करण्यात येणारे मदत कार्य तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने होणारा खर्च याची जणू स्पर्धाच लागली आहे. 

शहरातील विशिष्ट प्रभागांमध्ये प्रतिष्ठित उमेदवाराकडून मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करून जनतेचा कौल आपल्या बाजूने मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना इतर प्रभागांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याच्या चिंतेमुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

या अनुषंगाने उमेदवार आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्याकडून परस्परांमध्ये खर्चाची ही स्पर्धा कोणत्या थरापर्यंत जाईल याविषयी अंदाज बांधले जात आहे. चौका चौकात या दृष्टीने होणारी चर्चा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, एकमेकांना कामातून आव्हान देत असताना त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री कोठून मिळवायची असा प्रश्न गोरगरीब परंतु उमेदवारीची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्यांसमोर निर्माण झाला आहे.

जे अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात परंतु आर्थिक दृष्टीने अल्प उत्पन्न गटात मोडतात असे सर्व संभाव्य उमेदवार तुळजापूर नगरपरिषदेच्या या होणाऱ्या निवडणुकीच्या बाहेर फेकले जातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याचे कारण असे की नगरपरिषदेची निवडणूक लढवणे म्हणजे मोठ्या प्रमाणावर खर्च करणे असे समीकरण झाले आहे. याचा धसका या सामान्य कार्यकर्त्यांनी घेतला आहे. 

त्यामुळे तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुळजापुरात चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे.

 
Top