तुळजापूर, दि. १ : डॉ.सतीश महामुनी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची कवड्याची माळ आणि कुंकवाचा प्रसाद पाठविण्यात आला आहे, या दिवशी तुळजापूरच्या कवड्याच्या माळाचे विशेष महत्त्व या कार्यक्रमांमध्ये अनेक वर्षापासून आहे.
श्री. तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांच्यामार्फत ही कवड्याची माळ व तुळजाभवानी देवीच्या पायाला लावलेले कुंकू ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य छोट्या चांदीच्या मूर्तीला तसेच इतर मानाच्या ठिकाणी कवड्याची माळ घातली जात आहे. या प्रसंगी करण्यात येणाऱ्या पूजेमध्ये तुळजाभवानीच्या या प्रसादाचे कुंकवाचा उपयोग होणार आहे, दि. १ जून सोमवार रोजी सकाळी तुळजापूर येथील पत्रकारांच्या उपस्थितीत येथील मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी सतीश खोपडे यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनास सदर कवड्याची माळ व कुंकू तुळजाभवानी देवीच्या पायाला स्पर्श करून देण्याबाबत विनंती केली.
प्रशासनाने त्यांच्या दूता मार्फत हा प्रसाद श्री सतीश खोपडे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर हा प्रसाद थेट रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे देण्यात आला. याप्रसंगी मंदिर कर्मचारी सत्यजित वाघे, माजी नगरसेवक राजेश शिंदे, पत्रकार श्रीकांत कदम, डॉ. सतीश महामुनी, गोविंद खुरुद, ज्ञानेश्वर गवळी ,अनिल आगलावे, कुमार नाईकवाडी, संजय खुरुद, सचिन ताकमोघे, शिशिर खोपडे, साईनाथ खोपडे,बालाजी बाशेवाड यांची उपस्थिती होती.