मुरूम,  दि.२३  :  

उमरगा तालुक्यातील  मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व उमरगा रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने फळबिया सीड बॉल तयार करण्यात आले. समाजातून संकलित केलेल्या फळांच्या बियाचे माती आणि गव्हाचे पीठ यांच्या मिश्रणाने ५००० सीड बॉल तयार करण्यात आले. 


कोरोना संकटात लॉकडाऊनच्या काळात आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना निसर्गाचे वरदान ठरलेल्या फळांचा आहार घेऊन आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात. परंतु निसर्गाच्या उपकाराची परतफेड करणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. या भावनेतून राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लबच्या वतीने फळबिया योजनेंतर्गत सर्वांना आवाहन करण्यात आले होते, की आपण आणि आपल्या कुटुंबाने सेवन केलेल्या फळांच्या सर्व बिया जतन करून ठेवाव्यात. त्या स्वच्छ करून वाळवून आमच्याकडे जमा कराव्यात. या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ५००० पेक्षा जास्त बिया संकलित झाल्या. 

पावसाळ्याच्या पूर्वसंधेला या सर्व बिया आपल्या परिसरामध्ये पसरून फळझाडांची नैसर्गिक रोपण होण्यास मदत होईल, या भावनेतून सीड बॉल तयार करण्यात आले होते. सदर सीड बॉलमध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, पेरू, चिकू , खजूर आदि. बियाचे जवळ पास दोन हजार सीड बॉल तयार केले आहेत. हे सर्व सीड बॉल मुरूममोड ते मुरूमगावापर्यंत दोन्ही बाजूला टाकण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते बुधवारी  दि.२३ रोजी करण्यात आले. 


यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.सायबण्णा घोडके, महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते डॉ.महेश मोटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.रवी आळंगे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा सचिव डॉ.सुधीर पंचगल्ले, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.भिलसिंग जाधव, डॉ.राजेंद्र गणापूरे, डॉ.शिला स्वामी, डॉ.विनायक रासुरे, डॉ.नागोराव बोईनवाड, प्रा. प्रतापसिंग राजपूत, प्रा.प्रकाश कुलकर्णी, प्रा.मुकुंद धुळेकर, प्रा.राजकुमार तेलंग, प्रा.संजय गिरी, प्रा.भूषण पातळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मनोज हावळे, योगेश पांचाळ, दिलीप घाटे आदींनी पुढाकार घेऊन सदर मोहिम यशस्वी केली.   

                                 
 
Top